महाराष्ट्रातील रेल्वेत सर्वाधिक गुन्हे!; एनसीआरबीचा अहवाल, उत्तर प्रदेश १५व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 03:55 PM2017-12-04T15:55:57+5:302017-12-04T16:05:59+5:30

रेल्वेगाड्या, स्थानके तसेच परिसरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. मागील वर्षभरात राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) महाराष्ट्रात तब्बल २ लाख ३१ हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे.

Highest crime in railway in Maharashtra! NCRB report, Uttar Pradesh 15th place | महाराष्ट्रातील रेल्वेत सर्वाधिक गुन्हे!; एनसीआरबीचा अहवाल, उत्तर प्रदेश १५व्या स्थानी

महाराष्ट्रातील रेल्वेत सर्वाधिक गुन्हे!; एनसीआरबीचा अहवाल, उत्तर प्रदेश १५व्या स्थानी

Next
ठळक मुद्देमागील वर्षभरात महाराष्ट्रात तब्बल २ लाख ३१ हजार गुन्ह्यांची नोंदगुन्ह्यांमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत उत्तर प्रदेशात पंधराव्या स्थानावर

पुणे : रेल्वेगाड्या, स्थानके तसेच परिसरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. मागील वर्षभरात राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) महाराष्ट्रात तब्बल २ लाख ३१ हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण २० टक्के आहे. दरवर्षी या गुन्ह्यांमध्ये वाढच होत असून त्यात चोरीच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) रेल्वेशी संबंधित गुन्ह्यांची माहिती वार्षिक अहवालात दिली आहे. त्यानुसार मागील वर्षभरात आरपीएफ आणि जीआरपीने संपूर्ण देशभरात सुमारे ११ लाख ३० हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यामध्ये आरपीएफने नोंदविलेल्या गुन्हे सर्वाधिक १० लाख ६९ हजार एवढे आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे १ लाखाने वाढले आहे. राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे घडत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. राज्यात आरपीएफने नोंदविलेले गुन्हे २ लाख २३ हजार ३६० आहे. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असले तरी महाराष्ट्राच्या तुलनेत गुन्ह्यांचे प्रमाण तब्बल एक लाखाने कमी आहे. दर एक लाख लोकसंख्येच्यामागे राज्यातील रेल्वेत १८५ दखलपात्र गुन्हे दाखल होतात. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण २१ टक्के आहे. या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. तर लोकसंख्येच्या तुलनेत उत्तर प्रदेशात पंधराव्या स्थानावर आहे. 
जीआरपीने २०१६ मध्ये महाराष्ट्रात ७ हजार ६८४ गुन्हे दाखल केले होते. याबाबतीत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक गुन्हे दाखल असले तरी लोकसंख्येच्या तुलनेत गुन्हांचा विचार केल्यास उत्तर प्रदेश पाचव्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. जीआरपी तसेच आरपीएफने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणात दरवर्षी वाढ होत चालली आहे. राज्यात तुलनेने रेल्वेचे जाळे कमी असले तरी घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण मात्र चिंतेची बाब ठरत आहे.

‘आरपीएफ’ने नोंदविलेले गुन्हे : 
राज्य                          २०१५              २०१६             (एक लाख लोकसंख्येमागे) 
                                                                              दखलपात्र गुन्ह्यांचे प्रमाणे

१. महाराष्ट्र                १९६६०२         २२३३६०           १८५.३
२. उत्तर प्रदेश            १०६५७७        १२४७२०            ५६.९
३. मध्य प्रदेश             ८८२२६          ९८९६४              १२६.५
४. तामिळनाडू            ७९८५३           ८१६३९             ११७.४
५. गुजरात                  ७०८७७          ७७२३०              १२२.४
६. आंध्र प्रदेश             ५१०७६           ६९६८९             १३४.७


‘जीआरपी’ने नोंदविलेले गुन्हे :
राज्य                       २०१५        २०१६         (एक लाख लोकसंख्येमागे)        
                                                                दखलपात्र गुन्ह्यांचे प्रमाण

१. उत्तर प्रदेश         ७१६८           १०९१८              ३.८ 
२. महाराष्ट्र             ७५५६           ७६८४                ६.१
३. केरळ                  ६०४६           ७६७८                ०.९
४. गुजरात              ६८०४           ६५६१                २.४
५. मध्य प्रदेश         ४६४९           ५२५३                ६.५


चोरीचे प्रमाण अधिक
रेल्वेमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. जीआरपीने दाखल केलेल्या २०१६ मधील गुन्ह्यांमध्ये ६ हजार ५५१ गुन्हे चोरीचे होते. तसेच जबरी चोरीच्या २०५ घटना घडल्या आहेत. देशात जबरी चोरीच्या सर्वाधिक घटना उत्तर प्रदेशात ३८१ समोर आल्या आहेत. दरोड्याचे प्रमाण मात्र महाराष्ट्रातच जास्त आहे. २०१६ मध्ये देशात रेल्वेध्ये दरोड्याच्या ५३ घडल्या होत्या. त्यापैकी सर्वाधिक १३ घटना महाराष्ट्रातील आहेत. तसेच फसवणुक, मारहाण, सार्वजनिक सुरक्षितता, अनधिकृत विक्रेते, रेल्वे मालमत्ता अशा विविध घटनांशीसंबंधित गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Web Title: Highest crime in railway in Maharashtra! NCRB report, Uttar Pradesh 15th place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.