आगीच्या सर्वाधिक घटना '' शॉर्टसर्किट'' मुळेच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 07:00 AM2019-05-12T07:00:00+5:302019-05-12T07:00:02+5:30
शहरात सर्वाधिक आगीच्या घटना हा शॉर्ट सर्किटमुळे अथवा गॅस गळतीमुळे होत असल्याचे दिसून आले आहे़
विवेक भुसे
पुणे : शहरात दररोज ८ ते १० आगीच्या घटना घडत असतात़. त्यात शॉर्टसर्किट व गॅस गळतीचे निम्मे निम्मे प्रमाण आहे़. एकदा घर अथवा दुकान घेतल्यानंतर आपण अनेक वर्षे घरातील वायरिंगकडे लक्ष देत नाही़. मात्र घर, दुकानातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दरवर्षी वाढत जातात़. त्यातून आगीच्या घटना घडतात़ एकूण आगीच्या घटनांमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याच्या घटना निम्म्या असतात, असे अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले़.
उरळी देवाची येथे गुुरुवारी राजयोग साडी डेपोला लागलेल्या आगीत ५ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला़. शहरात दररोज आगीच्या घटना घडत असतात़. त्यात प्रामुख्याने दुकानात, घरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीचे प्रमाण मोठे आहे़. पुण्यात गेल्या वर्षभरात तब्बल ३ हजार १७९ आगीच्या घटना घडल्या़ त्यात सर्वाधिक १हजार ७८५ घटना या घरांमध्ये अथवा दुकानांमध्ये लागलेल्या आगीच्या होत्या़.
या आगीच्या घटनांबाबत प्रशांत रणपिसे यांनी सांगितले की, शहरात सर्वाधिक आगीच्या घटना हा शॉर्ट सर्किटमुळे अथवा गॅस गळतीमुळे होत असल्याचे दिसून आले आहे़. त्यात अनेक आगीच्या घटनांमध्ये आग कशी लागली. हे पाहण्यासाठी कोणी नसते़ अथवा बंद घराला, दुकानाला आग लागून त्यात सर्व काही जळून खाक होते़. त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकत नाही़ अशा अनेक घटना असतात़.
घरात अथवा दुकानात कन्सिल वायरिंग केलेली असते़. त्यामुळे या वायरींची स्थिती काही वर्षांनी कशी आहे़ हे समजू शकत नाही़. घरात अथवा दुकानात दरवर्षी नव्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंची भर पडते़. त्याचा परिणाम या वायरिंगवर काही होतो, त्या वायरिंगचा विजेचा दाब सहन करण्याची क्षमता किती, आपण त्यावर किती विजेचा दाब टाकत आहोत, या कधीही दुकानदार, घरातील व्यक्ती विचार करीत नाहीत़. तसेच त्यामुळे ओव्हरलोड झाल्यावर या वायरींचे क्षमता कमी होते़. त्यात आतल्या आत जळून जाण्याची शक्यता वाढते़ तसेच रात्री अपरात्री अचानक विजेचा दाब वाढण्याची शक्यता असते़. त्यातून वायरिंग जळून शॉर्ट सर्किट होतो व आग लागून होत्याचे नव्हते होते़. त्यामुळे काही वर्षांनी घरातील तसेच दुकानातील वायरिंग व्यवस्थित आहे का़, वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणांना लागणारी विजेचा दाब या वायरी सहन करु शकतात का, याची तपासणी करणे गरजेचे आहे़