उजनीत प्रथमच उच्चांकी पातळी, ४० वर्षांत पहिल्यांच असे घडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 02:59 AM2018-04-03T02:59:20+5:302018-04-03T02:59:20+5:30
उजनी धरण व्यवस्थापन समितीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवून धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने, यंदाच्या वर्षीच्या उन्हाळ्यात उजनी धरणाच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात उन्हाळ्यातील उच्चांकी पाणीपातळी (८६.८५ टीएमसी) आजघडीला नोंदवली गेली आहे.
इंदापूर - उजनी धरण व्यवस्थापन समितीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवून धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने, यंदाच्या वर्षीच्या उन्हाळ्यात उजनी धरणाच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात उन्हाळ्यातील उच्चांकी पाणीपातळी (८६.८५ टीएमसी) आजघडीला नोंदवली गेली आहे.
उजनी धरण हे महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. उजनी धरणाच्या पाण्यावरून नेहमी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यांमध्येही संघर्ष होताना लोकांनी पाहिले आहे. उन्हाळ्यात तर धरणाच्या पाण्यासाठी आंदोलने होतात. तथापि या उन्हाळ्यात असे चित्र पाहावयास मिळण्याची शक्यता धूसर आहे. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी आहे. पावसाळ्यात उजनी पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे या वर्षी साठवण क्षमतेपेक्षा जास्त १२१ टीएमसी पाणी उजनी धरणाकडे आले होते. मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध असल्याने उजनीच्या अधिकारी वर्गाने समन्वय ठेवत, पाण्याचे काटेकोर नियोजन केले.
गेल्या खरीप व रब्बी हंगामाच्या दरम्यान उजनी धरणातून कालवा व भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. बोगद्याद्वारे, तळे, तलाव, बंधारे भरून घेण्यात आले. पाणी मोठ्या प्रमाणात साठले. परिणामी धरणाच्या पाण्याची मागणी कमी झाली. दोन महिने पाणी सोडावे लागले नाही. त्याचा फायदा होऊन उजनी धरणाचा पाणीसाठा उच्चांकी राहिला आहे.
उजनीचा सर्वाधिक नीचांकी पाणीसाठा हा दि. ४ जुलै २०१६ रोजी नोंदवला गेला होता. त्या वेळी धरणात वजा ५३.४३ टक्के पाणी होते. एकूण पाणीसाठा हा केवळ ३५.३५ टीएमसी होता.
उजनीचा पाणीसाठा
उजनी धरणातील आजची पाणी परिस्थिती अशी आहे एकूण पाणीसाठा
८६. ८५
टीएमसी.
४३. २९
टक्केवारी