सूर्यदेव कोपला, पुणेकर हैराण! हंगामातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 02:01 PM2022-04-30T14:01:39+5:302022-04-30T14:05:40+5:30
गेले काही दिवस दिवसाच्या तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे...
पुणे : गेले काही दिवस सूर्यदेव कोपला असून, असह्य उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत. गुरुवारी या हंगामातील सर्वाधिक कमाल तापमान ४१.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. आणखी पाच दिवस तापमान अधिक राहणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
गेले काही दिवस दिवसाच्या तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. शिवाजीनगर येथे मंगळवारी ४०.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्यात आज वाढ होऊन बुधवारी ४१.१ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले. गुरुवारी त्यात आणखी वाढ होऊन तापमान ४१.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात आज ४० अंशांहून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
दुपारी उन्हाचा कडाका असह्य होत असल्याने रस्त्यांवर जणू अघोषित संचारबंदी असल्यासारखे दिसून येत आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या रोडावलेली दिसून येते. एरवी सायंकाळनंतर काहीसा गारवा अनुभवायला येत असतो. पण, सध्या सायंकाळनंतरही उष्ण वारे वाहताना दिसून येतात.
शुक्रवारीही शहरातील कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहणार असून पुढील पाच दिवस कमाल तापमान हे ४० अंशाच्या पुढे राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शिवाजीनगर - ४१.८
पाषाण - ४१.८
लोहगाव - ४१.७
चिंचवड - ४३.६
मगरपट्टा - ४२.६