पुणे पदवीधर, शिक्षकसाठी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक मतदान; उद्या होणार मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 12:49 PM2020-12-02T12:49:57+5:302020-12-02T13:05:34+5:30
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी विभागातील पुणे, सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात मतदान झाले.
पुणे : पुणे विभागात पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघात प्रथमच सर्वाधिक मतदान झाले आहे. या मतदार संघातील सर्व जिल्ह्यातील मतदान पेट्या पुण्यातील बालेवाडी गुरूवारी पहाटेपर्यंत पोहचतील. त्यानंतर बुधवार (दि.३) रोजी बालेवाडी येथे मतमोजणीला सुरुवात होईल. परंतु यावेळी उमेदवारांची प्रचंड संख्या,त्यात झालेले भरघोस मतदान आणि मतमोजणीची किचकट प्रक्रिया यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी शुक्रवारची दुपार अथवा सायंकाळपर्यंत जाहीर होईल असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. पुणे विभागात पदवीधरसाठी ५७. ९६ तर शिक्षकसाठी ७३.०४ टक्के मतदान झाले आहे.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी विभागातील पुणे, सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात मतदान झाले. गुरूवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी तब्बल १२०० कर्मचारी आणि ७०० पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. यात पदवीधर मतदार संघासाठी ११२ टेबल व शिक्षकसाठी ४२ टेबल लावण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. दरम्यान मतमोजणी शांततेत, सुरळीत आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे राव यांनी सांगितले.
--------
अशी होते मतमोजणी
पदवीधर व शिक्षक मतदार संघातील सर्व जिल्ह्याच्या मतपत्रिका एकत्र करणार. मतपत्रिकांची मोजणी करून स्वतंत्र ट्रेमध्ये ठेवणा. त्यानंतर वैध व अवैध म्हणजे बाद झालेले मतपत्रीका वेगळ्या काढण्यात येणार आहे. त्यानंतर एकूण वैध मतपत्रीका निश्चित झाल्यानंतर उमेदवार निवडून येण्यासाठीचा मतदानाचा कोट निश्चित केला जाईल. यात एकूण वैध मतदान व एकूण उमेदवारांवर हा कोटा निश्चित होईल. ( उदा: एकूण वैध मतदान 800 असेल तर भागिले 2 + निवडून द्यावयाची संख्या 1 : पहिल्या पसंती क्रमांकत निवडून येण्याचा मतांचा कोटा 401) असे निश्चित केले जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. यात पहिल्या पसंती फेरीत एकाद्या उमेदवाराला निश्चित केलेल्या कोट्या ऐवढे मतदन झाल्यास संबंधित उमेदवार निवडून आल्याचे जाहीर केले जाईल. तसे न झाल्यास दुसऱ्या पसंती क्रमांकाची मते मोजावी लागतील. असे झाल्यास मतमोजणीची प्रक्रिया लांबू शकते.