अतिदूर्गम भागातील घरे उजळली लख्ख प्रकाशाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 07:33 PM2018-05-08T19:33:00+5:302018-05-08T19:33:00+5:30
केवळ चांदण्यांच्या टिपूर प्रकाशात राहण्याची सवय असणा-या येथील नागरिकांची घरे लख्ख प्रकाशाने उजळून निघाली.
पुणे: जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत वसलेल्या अतिदुर्गम भागातील चांदर या गावासह दोन वस्त्यांमध्ये महावितरणने अवघ्या सात दिवसांत ६५ वीजखांब व एका वितरण रोहित्राने वीजयंत्रणा उभी केली.त्यामुळे केवळ चांदण्यांच्या टिपूर प्रकाशात राहण्याची सवय असणा-या येथील नागरिकांची घरे लख्ख प्रकाशाने उजळून निघाली.
पुणे व रायगड जिल्ह्याच्या सिमेलगत सह्याद्रीच्या घनदाट वनराईत दोन डोंगराच्या खोल दरीत केवळ १८ घरांचे चांदर हे गाव वसलेले आहे.तसेच बाजूच्याच डोंगरमाथ्यावर १० घरांची टाकेवस्ती व दुस-या डोंगरमाथ्यावर १८ घरांची डिगेवस्ती असा ४६ घरांचा परिसर आहे. चांदर पुण्यापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर असून पावसाळ्यात सुमारे ५ ते ६ महिने चांदर व लगतच्या दोन्ही वस्त्यांचा जगाशी संपर्क तुटलेला असतो. परंतु, डोंगरद-यातील याच गावात महावितरणने सामाजिक बांधिलकीचे एक नवीन प्रकाशपर्व सुरु केले आहे.
महावितरणचे सुमारे ६० कर्मचारी चांदर परिसरातील डोंगरद-यात वीजयंत्रणा उभारण्यासाठी सकाळी ९ ते रात्री उशिरापर्यंत राबत होते. अत्यंत खडतर रस्त्याने सर्वप्रथम वीजखांब, तारा व इतर तांत्रिक साहित्य एकाच दिवसात आणल्यानंतर प्रत्यक्ष वीजयंत्रणा उभारण्याचे काम सुरु झाले. सलग सात दिवसांच्या अविश्रांत कामानंतर महावितरणने डोंगरद-यातून खेचून आणलेला येथील घरात प्रकाश पोहचला. त्यासाठी सुमारे १३०० मीटर डोंगरदरीत असलेल्या चांदर गावासाठी डोंगर उतारावर एकूण १७ वीजखांब उभारावे लागले. ही वीजयंत्रणा उभारण्यासाठी महावितरणला सुमारे २० लाख रुपये खर्च आला. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चांदर गाव व दोन वस्त्यांमध्ये प्रत्येकी दोन नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या.
डोंगर द-यातून अडीच- तीन तास प्रवास करून चांदर येथील शाळेत केवळ एका विद्यार्थ्याला अध्यापन करण्यासाठी जाणारे रजनीकांत मेंढे यांच्यामुळे अतिदुर्गम भागातील चांदर गाव ख-या अर्थाने समोर आले.या शाळेला महावितरणकडून नवीन वीजजोडणी देण्यात आलेली आहे.