उच्च शिक्षित तरुणांना विकासाच्या संधी मिळत नाहीत- गिरीश प्रभुणे यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:22 AM2021-01-13T04:22:59+5:302021-01-13T04:22:59+5:30
पुणेः- केवळ लिहिता-वाचता आले, एवढे सोडता पारंपरिक शिक्षणाचा माझ्या सामाजिक कार्याला काहीही फायदा झाला नाही. आजही उच्च शिक्षण घेऊन ...
पुणेः- केवळ लिहिता-वाचता आले, एवढे सोडता पारंपरिक शिक्षणाचा माझ्या सामाजिक कार्याला काहीही फायदा झाला नाही. आजही उच्च शिक्षण घेऊन तरुणांना नोक-या नाहीत. मी ज्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे, त्या समाजातील तरुण उच्च शिक्षित असूनही, त्यांना विकासाच्या संधी मिळत नसल्याची खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा, पुणे आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, सातारा यांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, विचारवंत आणि वक्ते स्व. डाॅ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना जीवनगौरव पुरस्कार रविवारी (दि.१०) प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी डाॅ. संभाजी मलघे यांना ''''''''आचार्यदर्शन'''''''' या ग्रंथासाठी आणि प्रा. जे. पी. देसाई यांना ''''''''माझी भाषणे, प्रसंग आणि आठवणी'''''''' या ग्रंथासाठी साहित्य पुरस्कार, तर पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांना सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले, तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, तसेच महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थचे अध्यक्ष शिरीष चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभुणे यांनी साहित्यातून सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याची भावना व्यक्त केली .
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले की, पूर्वीच्या काळात वेगवेगळ्या विचारधारांच्या चळवळी कार्यरत होत्या आणि प्रत्येकाला एकमेकांच्या चळवळीविषयी आदर होता. काळाच्या ओघात या उदारतेची जागा कट्टरतेने घेतली. ही कट्टरता इतकी वाढली की, एकमेकांच्या कामाचा आदर करणे आपण विसरून गेलो आहोत.
प्रा. मिलिंद जोशी यांनी समाजातील विचारवंतांनी देखील डावे-उजवे आदी सर्व भेद, भाव, द्वेष, कल दूर सारून समान व्यासपीठावर एकत्र येऊन समाजाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले पाहिजे असे नमूद केले.
प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी, तर उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन इटकर यांनी आभार मानले.
.....