द्रुतगती महामार्ग बनला पैसे कमाविण्याचा ‘मार्ग’
By admin | Published: December 8, 2014 01:14 AM2014-12-08T01:14:14+5:302014-12-08T01:14:14+5:30
वाढत्या अपघातांमुळे चर्चेत असणारा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आता लूटमारीमुळेही चर्चेत येऊ लागला आहे. लूटमारीचेही दोन प्रकार आहेत.
मंगेश पांडे, पिंपरी
वाढत्या अपघातांमुळे चर्चेत असणारा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आता लूटमारीमुळेही चर्चेत येऊ लागला आहे. लूटमारीचेही दोन प्रकार आहेत. हत्याराचा धाक दाखवून अथवा धमकी दमदाटी करून केलेली लुटमार, तर दुसरी मदतीच्या नावाखाली प्रवाशांची होत असलेली लूटमार आहे. काही जणांसाठी तर हा महामार्ग म्हणजे पैसे कमाविण्याचा मार्ग बनला आहे.
क्रेनसाठीही जादा पैसे
अपघात झाल्यास अथवा वाहन बंद पडल्यास मदतीसह अपघातग्रस्ताला मानसिक आधार देणेही आवश्यक असते. अपघातातील वाहन बाजूला घेणे, वाहतूककोंडी झाल्यास त्यावर तातडीने उपाययोजना राबवून वाहतूक सुरळीत करणे महत्वाचे असते. त्यासाठी क्रेनची आवश्यकता असते. रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या संबंधित कंपनीकडून काहीठिकाणी अल्पदरात क्रेनही उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, अपघात होताच कंपनीऐवजी इतर खासगी क्रेन घटनास्थळी दाखल होतात. अपघातात वाहनाचे नुकसान झालेल्या मालक अथवा चालकावरच अरेरावी करीत त्याच्याकडून मनाप्रमाणे पैसे उकळले जातात. अपघातग्रस्त वाहनचालकाला पैसे देण्याशिवाय पर्याय नसतो. अपघाताच्यावेळी वाहन उचलताना पैसे उकळण्याची संधी असते. यासाठी घटनास्थळी पोहोचण्यासाठी क्रेनचालकांमध्ये स्पर्धाच असते. कंपनीच्या क्रेनने वाहन उचलून बाजुला ठेवल्यास पुढे इतर क्रेनने वाहन नेणे शक्य होते. मात्र, तसे होत नाही.
फिटरही कमवातात मनाप्रमाणे पैसे
महामार्गावर असलेले फिटरदेखील मनाप्रमाणेच वाहन दुरूस्तीचे पैसे आकारतात. हे प्रकार खालापूर टोल नाका ते खंडाळा या ‘घाटसेक्शन’ मध्ये मोठ्याप्रमाणात चालतात. क्रेन व फिटरशी संबंधित काहीजण महामार्गावर घिरट्या घालत असतात. याच भागात घाट चढताना वाहने बंद पडण्याच्या अनेक घटना घडतात. वाहन बंद पडल्याचे आढळताच तातडीने त्यांच्याशी संबंधित असलेल्या क्रेन व फिटरला कळविले जाते. वाहनमालकासाठी वाहन दुरूस्त होणे गरजेचे असते. त्यामुळे हवे तितके पैसे मोजून वाहन दुरूस्त करून घेतले जाते. बाहेरच्या जिल्ह्यातील अथवा राज्यातील वाहनचालकांना कोंडीत पकडले जाते. महामार्गावरील पोलीस मदत केंद्रात पूर्णवेळ कर्मचारी हजर असणे आवश्यक आहे.