पुण्यात महामार्ग खचला अन् दोघांचा जीव घेतला; वारजे परिसरात अभूतपूर्व कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 08:44 AM2023-06-07T08:44:35+5:302023-06-07T08:45:14+5:30
महामार्ग खचल्याने वारजेत अभूतपूर्व वाहतूककोंडी...
वारजे (पुणे) : वारजे बाह्यवळण महामार्गावर वारजेतील ढोणे वाडा हॉटेलसमोर ओट्यावरील पुलाचे काम सुरू होते. महामार्गाच्या खालची माती ढासळून रस्ता खचला आहे. यामुळे दोन अपघात होऊन दोघे जाग्यावरच गतप्राण झाले. सोमवारी संध्याकाळी टेम्पो दुभाजकावर आदळून चालक ठार झाला, तर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास वाहतूक कोंडीतून निघून एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला.
भाजी वाहतूक करणारा टेम्पोचालक ओंकार दत्तात्रय पानसरे (वय २१, रा. जुन्नर) आणि नदी पुलावरील अपघातात ऋतुजा दिलीप वायकर (वय २३, रा. नन्हे आंबेगाव) ही मुलगी मृत झाली. यामुळे मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत कात्रजकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
तातडीची गरज नसतानाही ठेकेदाराने आधी साताऱ्याकडून येणाऱ्या मार्गिकेचा पूल व बॉक्स कलवर्ट बांधून ठेवला आहे. सोमवारी कात्रजकडे जाणाऱ्या मार्गिकेचा बॉक्स पुलाचे काम करीत असताना त्याच्या खालची माती ढासळली. या ठिकाणी रस्त्याची उंची २० फूट वर आहे. आता या खालचे फाउंडेशनचे काँक्रीट भरायला किमान १५ दिवस जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कात्रजकडे जाणारी वाहतूक वारजेत विस्कळित होण्याचा कयास आहे. सोमवारी, मंगळवारीही डुक्कर खिंडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संध्याकाळी आठच्या सुमारास तर ही रांग चांदणी चौकापर्यंत गेली.