महामार्ग ‘असून अडचण, नसून खोळंबा’
By admin | Published: May 27, 2017 01:20 AM2017-05-27T01:20:50+5:302017-05-27T01:20:50+5:30
सासडवमधून जाणाऱ्या पालखीमार्गाचे रखडलेले रुंदीकरण, उड्डाणपुलाचा अभाव, अरुंद रस्ते, त्यात भरधाव जाणारी वाहने यांमुळे सासवडमधून जाणारा महामार्ग येथील नागरिकांसाठी
बाळासाहेब कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : सासडवमधून जाणाऱ्या पालखीमार्गाचे रखडलेले रुंदीकरण, उड्डाणपुलाचा अभाव, अरुंद रस्ते, त्यात भरधाव जाणारी वाहने यांमुळे सासवडमधून जाणारा महामार्ग येथील नागरिकांसाठी ‘असून अडचण, नसून खोळंबा’ झाला आहे. या महामार्गामुळे सासवडचे दोन भाग पडल्याने रस्ता ओलांडताना नागरिकांची त्रेधा उडत आहे.
सासवड शहरातून पालखी महामार्ग जात असून, त्यामुळे सासवडचे दोन भाग झाले आहेत. एका बाजूला शाळा, महाविद्यालय, भाजी मंडई, सासवडगाव, बाजारपेठ, बस स्थानक, पीएमटी स्थानक असून दुसऱ्या बाजूला वाढलेली लोकवस्ती आहे.
सासवड शहराचा झपाट्याने विकास होत असून सोनोरी, अंबाडी, पारगाव या गावांकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला मोठ्या इमारती उभ्या आहेत. त्यामध्ये अनेक कुटुंबे राहतात. रहिवासी विभाग मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व लोकांना महामार्ग ओलांडून शाळा, महाविद्यालय, भाजी बाजार, बाजारपेठत यावे लागते. हा महामार्ग झाला तरी त्यावर कोणत्याच सोयी नाहीत.
रास्ता ओलांडण्यासाठी पांढरे पट्टे नाहीत, वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत, दुभाजक नाहीत; त्यामुळे वाहने वेगाने येत असतात. यामुळे महामार्ग ओलांडणे कठीण होते. त्यातही विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची सर्वाधिक गैरसोय होते.
हा महामार्ग तयार करताना एसटी स्थानकाजवळ उड्डाणपूल होणार होता, असे संगितले जाते. त्याचबरोबर शहरात जाण्यासाठी लहान रस्ते होणार होते. मात्र, यापैकी काहीच झालेले नाही. रस्ता मोठा झाला; पण इतर सोयी झाल्या नाहीत. राज्य शासनाच्या ताब्यात रस्ता होता, तो आता केंद्र शासनाकडे जाणार आहे. पालखी महामार्ग म्हणून त्याचा विकास होणार होता, असे समजते. मात्र, अद्याप काहीही काम झालेले नाही. यामुळे शहरात जाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते.