रिंगरोडला महामार्गाचा पर्याय : थोपटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:13 AM2021-08-21T04:13:57+5:302021-08-21T04:13:57+5:30
नसरापूर : महामार्ग क्र. ४८ वरील केळवडे येथील महामार्गावरून रिंगरोड खोपीमार्गे नेल्याने कमी अंतरात रिंगरोड झाल्याने रिंगरोड संभाव्य सर्व ...
नसरापूर : महामार्ग क्र. ४८ वरील केळवडे येथील महामार्गावरून रिंगरोड खोपीमार्गे नेल्याने कमी अंतरात रिंगरोड झाल्याने रिंगरोड संभाव्य सर्व खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे शेतकरी विरोधाचा प्रश्नच उरत नाही, असे मत आमदार संग्राम थोपटे यांनी मांडले.
रिंगरोडविरोधी कृती समिती पदाधिकाऱ्यांबरोबर व रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांची समन्वय बैठक धांगवडी (ता. भोर) राजगड ज्ञानपीठाच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. या वेळी झालेल्या उभय चर्चेनंतर महामार्गाच्या पर्यायाचा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. या समन्वय बैठकीस आमदार संग्राम थोपटे, रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता ए. पी. नागरगोजे, कार्यकारी अभियंता गणेश चौरे, कृती समितीचे अध्यक्ष शामसुंदर जायगुडे, अण्णासाहेब भिकुले, जितेंद्र कोंडे, शांताराम जायगुडे, बापू जगताप, केळवडेच्या सरपंच शोभा सोनवणे, शुभांगी इवरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे आदी शेतकरी,मान्यवर उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे म्हणाले, रिंगरोड केळवडे येथून खोपी (ता. भोर) पर्यंत नेताना सर्व बागायती शेतीक्षेत्र १४ किलोमीटर आहे. हे १४ किलोमीटर बागायती शेतीक्षेत्र रिंगरोड अंतरामधून पूर्ण वगळावे. या भागातील रिंगरोडसाठी केळवडेपासून खोपीपर्यंत महामार्गाचा वापर रिंगरोडसाठी झाल्याने हे अंतर फक्त ५ किलोमीटर आहे. असे केल्याने रस्ता उभारणीसाठी लागणाऱ्या खर्चात बचत होईल. त्यामुळे तसेच शेतकऱ्यांची जमीन संपादित न झाल्यास समस्या मिटणार आहे. या वेळी सासवड-गराडे येथून येणारा रिंगरोड कांबरे, करंदी व नायगाव येथून जात आहे. याऐवजी कांबरे येथून डोंगरातून बोगदा काढल्यास वरवे येथील डोंगरातून थेट महामार्गावर रस्ता येऊ शकतो. त्यामुळे कांबरे, करंदी व नायगाव येथील शेती वाचेल, असे कृती समितीमधील नायगाव येथील सदस्यांनी नवा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावास सर्वांनी अनुमती दर्शविली आहे.
या प्रस्तावामुळे शेतकऱ्यांची शेती वाचून, रिंगरोड खर्च वाचत असेल तर निश्चित विचार केला जाईल. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची परवानगी काढावी लागेल. या नवीन प्रस्तावातील रस्त्याबाबत कृती समिती सदस्य व अधिकारी एकत्र पाहणी करतील. त्याकरिता नकाशा तयार करून रस्ते विकास महामंडळाचे मोपलवार यांच्याशी चर्चा करण्यात येईल.
ए. पी. नागरगोजे. अधीक्षक अभियंता, रस्ते विकास महामंडळ.
२०नसरापूर
धांगवडी येथील राजगड ज्ञानपीठाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत सहभागी झालेले मान्यवर.
190821\3610img_20210816_143556__01.jpg
सोबत फोटो व ओळ : धांगवडी (ता. भोर) राजगड ज्ञानपीठाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत सहभागी झालेले मान्यवर.