चाकणमध्ये महामार्ग अडकले कचऱ्याच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:09 AM2021-04-06T04:09:44+5:302021-04-06T04:09:44+5:30
पुणे-नाशिक आणि तळेगाव-चाकण या महामार्गांवर दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा कोणाकडून टाकला जातो, हे समजत नाही.आजूबाजूला व्यवसाय करणारे व्यवसायिक आणि ...
पुणे-नाशिक आणि तळेगाव-चाकण या महामार्गांवर दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा कोणाकडून टाकला जातो, हे समजत नाही.आजूबाजूला व्यवसाय करणारे व्यवसायिक आणि औद्योगिक वसाहतीमध्ये कामावर जाणारे सुशिक्षित कामगार हा कचरा टाकत असल्याचे उघड झाले आहे.चाकण शहराच्या लगत असलेल्या नाणेकरवाडी आणि मेदनकरवाडी हद्दीतील असंख्य लोक पुणे-नाशिक रस्त्याच्या दुतर्फा हा कचरा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरून फेकून देत आहेत.यामुळे उड्डाण पूल आणि पुणे-नाशिक महामार्ग डंपिंग एरिया झाला आहे.
रानुबाईमळा ते खराबवाडी गावच्या हद्दीतील अनेक व्यावसायिक आणि मोठं मोठ्या सोसायट्यांमधील नागरिक तळेगाव-चाकण महामार्गावर जिथे मोकळी जागा मिळेल तिथे कचरा फेकत आहेत.यामुळे वरील दोन्ही मार्ग कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहेत.काही ठिकाणी सांडपाणी कचऱ्यात मिसळल्याने कचरा तो जागेवर कुजत आहे.तो उचलण्याची तसदी संबधित ग्रामपंचायत घेत नाही. त्यामुळे दुर्गंधीचा आणि ओंगळवाणे दृश्याचा त्रास रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या पादचारी आणि वाहनचालकांना सहन करावा लागतो आहे.
वाढत्या नागरीकीकरणामुळे चाकण पंचक्रोशीतील कचऱ्याची समस्या जटिल झाली आहे. कचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने नगर परिषदेसह परिसरातील ग्रामपंचायतींचा कचऱ्याची विल्हेवाट लावणे अवघड झाले आहे.कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प सुरू होणे गरजेचे आहे.अन्यथा भविष्यात चाकणच्या चोहोबाजूंने कचऱ्याचे ढीग पहायला मिळतील.
०५ चाकण कचरा
तळेगाव-चाकण रस्त्यावरील खराबवाडी गावच्या हद्दीतील कचरा