महामार्गाचे काम संथ गतीने
By admin | Published: May 13, 2014 02:49 AM2014-05-13T02:49:17+5:302014-05-13T02:49:17+5:30
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने होत आहे.
कापूरव्होळ : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने होत आहे. काही सुरु असलेल्या कामांच्या माध्यमातून ते जोरात चालल्याचे भासवण्याचे प्रकार महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स इन्फ्रा यांच्याकडून दिसत आहे. या धिम्या कामाच्या प्रकाराने अनेक नागरिकांना अडथळे निर्माण होत आहे. गेल्या वर्षापासून चाललेले राष्ट्रीय महामार्गाचे सुरुवातीचे काम प्रगतीपथावर दिसून येत असल्याचे नागरिकांना वाटत होते. हळूहळू याच कामाला पठारावस्था निर्माण झाली. याच काळात शिंदेवाडी येथील दुर्घटनेतील निष्पाप मायलेकींच्या बळीने प्रशासनाचे डोळे उघडले. पण कार्यवाही मात्र शून्य झाली. जी कामे आवश्यक होती ती झाली नाहीत. या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण विकासाच्या वृद्धीला वाळवंटाचे स्वरुप निर्माण होऊन कित्येक अडचणी व समस्या यांची संख्या वाढली. राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण व सुविधांचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सबठेकेदार रिलायन्स इन्फ्राला दिले. या रिलायन्स इन्फ्राचे विविध राज्यांमध्ये मोठी कामे चाललेली असून त्यांनी या महामार्गाचे काम काही इतर उपकंपन्यांना दिले. उपकंपन्यांना कामाचा मोबदला रिलायन्सने वेळेवर न दिल्याने त्या कार्यक्षमतेने काम करीत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिलायन्स इन्फ्राला दिलेल्या कामासंबंधी कोठेही तप्तरता नाही. प्राधिकरण याविषयी उदासीन असून रिलायन्सवर अंकुश नाही. राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या २ वर्षांपासून सुरू आहे. ठेकेदारांना विचारले असता काम कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही अशी उत्तरे मिळतात. आताचे सुरु असणारे काम म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशा गर्तेत सापडून रस्त्यांचे दुभाजक तुटलेले, उड्डाण पुलाचा राडारोडा त्याच ठिकाणी पडलेला आहे. पूर्वी काढलेल्या अतिक्रमणांनी डोके पुन्हा वर काढून ‘‘हम करे सो कायदा’’ असे चित्र निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर काहीच ठिकाणी दिशादर्शक फलक आहेत. अन्य महत्वाच्या ठिकाणी रिफ्लेक्टरचा अभाव दिसून येत आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्तात काढलेली अतिक्रमणे मूळरुप कशी घेतायेत याची सर्वत्र चर्चा नागरिकांमध्ये आहे. (वार्ताहर)