कामात अडथळा; महिलांवर गुन्हा दाखल
By admin | Published: May 8, 2017 02:00 AM2017-05-08T02:00:35+5:302017-05-08T02:00:35+5:30
चासकमान कालव्यातून पाणी चोरल्याप्रकरणी जातेगाव खुर्दचे माजी सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची घटना तसेच
लोकमत न्यूज नेटवर्क
केंदूर : चासकमान कालव्यातून पाणी चोरल्याप्रकरणी जातेगाव खुर्दचे माजी सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची घटना तसेच कालव्यातून गेटची मोडतोड करत पाणी चोरल्याप्रकरणी तीन अज्ञात शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असताना रविवारी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी २० ते २५ अज्ञात महिला शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : चासकमान कालव्यामधून पाणी सुरू असल्याने या ठिकाणी अधिकाऱ्यांचा पहारा सुरू आहे, तर करंदी येथील कोरेगाव भीमा धानोरे शाखा कालवा तसेच कालव्याच्या ठिकाणी आपटी पहारा सुरू असताना करंदी गावच्या हद्दीमध्ये चासकमानचे पाणी सुरू असताना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चासकमानचे अधिकारी त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले होते. या वेळी येथील कालव्याच्या साखळी क्रमांक ६८/२०० या ठिकाणचे गेट महिला शेतकऱ्यांनी कुलूप व साखळी तोडून उघडले होते व पाणी चोरून घेतले होते. या वेळी चासकमानच्या अधिकाऱ्यांनी तेथे जात येथील काही कर्मचाऱ्यांसह पाणी वाया जाऊ नये, म्हणून येथील चारीचे गेट बंद करत असताना या २० ते २५ महिला त्या ठिकाणी आल्या व तुम्ही गेट बंद करायचे नाही, असे म्हणून चासकमान अधिकाऱ्यांना प्रतिबंध करू लागल्या. या वेळी चासकमानच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड केले असून याबाबत शिक्रापूर येथील चासकमान पाटबंधारे शाखा क्र. दोनचे शाखाधिकारी रंगनाथ ज्ञानोबा भुजबळ यांनी शिक्रापूर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी वीस ते पंचवीस अज्ञात महिला शेतकऱ्यांविरुद्ध शासकीय कामात अडथळा तसेच पाणीचोरीप्रकरणी गुन्हा दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे करीत आहेत.