इंदापूर येथे हिंदी विषयाची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:52 AM2018-08-29T00:52:37+5:302018-08-29T00:52:56+5:30
राष्ट्रभाषा प्रचार- प्रसार समिती : हिंदी विषयाच्या शिक्षकांना मार्गदर्शन
इंदापूर : इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय व पुणे राष्ट्रभाषा प्रचार- प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी विषय शिक्षकांची एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. वर्धा येथील अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार समितीकडून इंदापूर महाविद्यालयाला हिंदी परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. या केंद्राचे उद्घाटन राष्ट्रभाषा प्रचार प्रसार समितीचे संचालक जयराम फगरे यांच्या हस्ते करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक या कार्यशाळेस उपस्थित होते.
या वेळी जयराम फगरे म्हणाले की, हिंदी भाषेच्या प्रचारासाठी, भाषेच्या विकासासाठी, नि:स्वार्थ - निरपेक्ष भावनेने प्रयत्न केले पाहिजे. प्राथमिक शाळांपासून ते वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत राष्ट्रभाषा समितीद्वारा घेण्यात येणाऱ्या हिंदी परीक्षा घेण्याचे आवाहन केले. तर प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले की, हिंदी विषयाच्या शिक्षकांनी हिंदी भाषेतूनच संभाषण केल्याने खºया अर्थाने हिंदीचा प्रचार प्रसार होईल. डॉ. सुभाष तळेकर यांनी हिंदी भाषेची आवश्यकता, हिंदी शिक्षकांचे योगदान व हिंदी भाषेतून मिळणारे रोजगार याची सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेस तालुक्यातील सर्व हिंदी शिक्षकांना बोलावून प्राचार्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून हिंदी शिक्षकांना प्रेरणा देण्याचे कार्य केल्याने ही कार्यशाळा कौतुकास पात्र असल्याचे मत केंद्रप्रमुख सविता कदम यांनी मांडले. या वेळी माजी प्राचार्य डॉ. सुभाष तळेकर व प्रा. रवींद्र साबळे उपस्थित होते. प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. शीतल माने यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ चव्हाण यांनी केले. प्रा. शुभांगी वाघ यांनी आभार मानले.