हिंदू राष्ट्राभिमान पोकळ, ढोंगी : कुमार केतकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:38 AM2018-10-15T01:38:27+5:302018-10-15T01:38:44+5:30
पुणे : सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली देशात हिंदू राष्ट्र प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना हिंदू राष्ट्र म्हणजे नेमके काय ...
पुणे : सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली देशात हिंदू राष्ट्र प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना हिंदू राष्ट्र म्हणजे नेमके काय अभिप्रेत आहे? हिंदू राष्ट्राच्या अभिव्यक्तीमध्ये नागालँड, तमिळनाडू यांचा समावेश आहे का, याचा विचार व्हायला हवा. हिंदू राष्ट्राभिमान पोकळ, ढोंगी आणि धोकादायक आहे, असे प्रतिपादन खासदार कुमार केतकर यांनी केले.
अनुबंध प्रकाशनातर्फे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी लिखित ‘सांस्कृतिक धोरणाचे वास्तव आणि सांस्कृतिक अनुशेष’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी नितू मांडके सभागृहात झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून केतकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते. लेखक अन्वर राजन आणि आकाशवाणीचे वृत्त विभागाचे उपसंचालक नितीन केळकर यांनी पुस्तकावर भाष्य केले.
केतकर म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्र अज्ञानी अवस्थेत आहे. त्यामुळे कोणतेही ज्ञान राज्यासाठी उद्बोधकच आहे. सांस्कृतिक धोरणाबाबत आठ वर्षांत सरकारकडून काही हालचाली झाल्या नाहीत, याबाबत समाजातून फारशी नाराजी नोंदवली गेली नाही. सभ्यता आणि संस्कृती यांचे अर्थ आणि संदर्भ वेगवेगळे आहेत. माणूस जन्माला आल्यावर लगेच संस्कृती उदयाला आली. आपल्या देशात सांस्कृतिकतेमध्ये कोणत्याही गोष्टीत समान धोरण नाही. सांस्कृतिक धोरण अस्तित्वात आले असते तर देशातील अंतर्गत असंतोष, संघर्ष कमी झाला असता. दहशतवादी म्हटले की इस्लाम, असेच हिंदू राष्ट्रवाद्यांना वाटते. प्रत्यक्षात खलिस्तानवादी हे आद्य दहशतवादी आहेत. १९४७ ते १९७६ या काळातील अखंड भारत हिंदू राष्ट्रवाद्यांना मान्य नव्हता. त्या अखंड भारतातील लोक आता परदेशी कसे ठरतील?’
सबनीस म्हणाले, ‘संस्कृती हा विकासाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. लोकांची संस्कृती शासन ठरवू शकत नाही. आमचे शासन माणसातले भेद संपवून सौख्य निर्माण करते का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. संविधानातील बंधुत्वाच्या संकल्पनेची कुचंबणा होत आहे.’