हिंदुस्तान अँटिबायोटिक कंपनी आता आयुर्वेदिक औषध उत्पादन करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 02:10 PM2020-10-12T14:10:52+5:302020-10-12T14:13:19+5:30
रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधांचे उत्पादन करणार
पिंपरी : हिंदुस्तान अँटिबायोटिक (एचए) कंपनी आता आयुर्वेदिक औषध उत्पादन करणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रतिकारशक्ती आणि इतर काही आजारांवर उपयुक्त ठरणारी औषधे तयार केली जातील. कंपनीने तसा प्रस्ताव केंद्रीय आयुष मंत्रालयाला पाठवला आहे.
गेल्या काही वर्षांपासून हिंदुस्थान अँटिबायोटिक आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कंपनीची जमीन विकण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. त्याच बरोबर उत्पन्नाची इतर साधने निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सॅनिटायझर आणि विविध आरोग्य चाचण्या करणारे यंत्र कंपनीने तयार केले आहे. त्याचाच भाग म्हणून आयुर्वेदिक औषधे कंपनीतर्फे तयार केली जातील. तसा प्रस्ताव आयुष मंत्रालयाला पाठवण्यात आला असून, मंजुरी मिळाल्यास लगेचच उत्पादन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे एचएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पर्शवभूमीवर प्रतिकारशक्तीला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रतिकारशक्ती चांगली असल्यास कोणत्याही आजाराला सामोरे जाता येऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आयुर्वेदिक गोळ्या तयार केल्या जातील. इतर काही आजारांवरील औषधे देखील तयार केली जातील. केवळ अँटिबायोटिकवर कंपनीचा गाडा चालविता येणार नाही. त्यामुळे उत्पन्नासाठी विविध मार्ग अवलंबण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. साधारण एक महिन्यात परवान्याची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असून, त्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.