सरकारचा हिंदुत्वाचा अजेंडा धोकादायक, माधव गोडबोले यांनी व्यक्त केली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 02:24 AM2018-02-13T02:24:26+5:302018-02-13T02:24:43+5:30
विकासाचा मंत्र हा भाजप सरकारच्या धोरणाचा भाग आहे, परंतु त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा धोकादायक आहे, असे माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी येथे सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृह व न्यायसचिव आणि लेखक डॉ. माधव गोडबोले यांच्याशी निवेदक सुधीर गाडगीळ यांनी संवाद साधला.
पुणे : विकासाचा मंत्र हा भाजप सरकारच्या धोरणाचा भाग आहे, परंतु त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा धोकादायक आहे, असे माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी येथे सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृह व न्यायसचिव आणि लेखक डॉ. माधव गोडबोले यांच्याशी निवेदक सुधीर गाडगीळ यांनी संवाद साधला. देशात २० टक्के अल्पसंख्यांक आहेत.
पुढील १०-१५ वर्षात ही संख्या ३०-३५ टक्क्यांपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे भारतात हिंदुत्व ही संकल्पना राबवण्याजोगी नाही. सरकारने धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवणे अत्यंत घातक आहे, अशा शब्दांत गोडबोले यांनी चिंता व्यक्त केली.
‘भाजपने लोकपाल विधेयकासाठी आंदोलन केले. त्यांचे सरकार येऊन ४ वर्षे झाल्यानंतरही याबाबत काहीच पावले उचलली गेली नाहीत. राजकीय टिपण्णीत अग्रेसर असलेला सोशल मीडिया विधायक बाबतीत सक्रिय दिसत नाही. बोलायचे पुष्कळ आणि करायचे काहीच नाही, हे चित्र आजही कायम आहे.
मुख्यमंत्री, पंतप्रधानांची काम करण्याची पध्दत बदलली आहे. कोणत्याही प्रकरणात ‘माझी दिशाभूल करण्यात आली’ असे म्हणण्याची फॅशन रुजली आहे.
लोकशाही अस्तित्वात आहे, तोवर उद्योगपतींना काय करू
द्यावे, काय करू देऊ नये, याचे
दंडक घातले पाहिजेत, अशी अपेक्षाही गोडबोले यांनी बोलून दाखविली.
...तर बाबरी मशीद वाचवता आली असती
बाबरी मशिदीचे पतन हा भारताला स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा धक्का होता. उत्तर प्रदेशातील राज्य सरकार बरखास्त करण्याची सूचना गृह विभागातर्फे करण्यात आली होती. सरकारला राष्ट्रपती राजवट लागू करता आली असती, असेझाले असते तर बाबरी मशीद वाचवता आली असती.
- माधव गोडबोले,
माजी केंद्रीय गृहसचिव