हिंजवडीत आयटीयन्सना वाहतूक नियमांचे वावडे, हेल्मेट सक्तीला तिलांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 01:14 AM2018-12-23T01:14:22+5:302018-12-23T01:14:49+5:30
समाजात उच्च शिक्षित व उचभ्रू अशी प्रतिमा असणारे ‘आयटीयन्स’ शहर आणि उपनगर परिसरातून लाखोंच्या संख्येने दररोज हिंजवडी आयटीपार्कमध्ये नोकरीनिमित्त येत असतात. यात दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीय आहे.
- रोहिदास धुमाळ
हिंजवडी : समाजात उच्च शिक्षित व उचभ्रू अशी प्रतिमा असणारे ‘आयटीयन्स’ शहर आणि उपनगर परिसरातून लाखोंच्या संख्येने दररोज हिंजवडी आयटीपार्कमध्ये नोकरीनिमित्त येत असतात. यात दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीय आहे.
दुचाकीसह कंपनीत प्रवेश करताना हेल्मेट सक्तीचे आहे. मात्र हेल्मेट नसल्याने आयटी अभियंते बिनधास्तपणे दुचाकी भर रस्त्यावरच पार्क करतात. वाहतूक नियमांना बगल देत आयटी पार्क परिसरात अशा हजारो दुचाकी दररोज भर रस्त्यावर बेकायदा पार्क करतात. वाहतूक नियमांचे वावडे असलेल्या आयटीयन्सकडून वाहतूक पोलिसांनी साडेचार महिन्यांत ६१ लाखांचा दंड वसूल केला आहे.
पिंपरी, चिंचवड, वाकड, थेरगाव, काळेवाडी, सांगवी, ताथवडे, बाणेर, औध यापरिसरातून नोकरीनिमित्त हिंजवडी आयटीपार्कमध्ये रोज हजारोच्या संख्येने ये-जा करतात. त्यासाठी दुचाकीचा सर्वाधिक वापर होत असल्याने वाहतूककोंडी होती. मात्र, वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी अनेकदा नियमांचे उल्लंघन केले जाते. उच्च शिक्षित तसेच परफेक्ट जीवनशैली जगणाऱ्या आयटीयन्सकडे सर्व सामान्य कुतूहलाने पाहतात. त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवत आपल्या मुलांनासुद्धा उच्च शिक्षित करण्याचे धेय्य बाळगतात. परंतु आयटीयन्सकडून असे नियमांचे उल्लंघन केले जाणार असेल तर ते समाजात काय आदर्श उभा करत आहेत याचे आत्मपरीक्षण व्हावे़
आयटीनगरीत येतात दररोज लाखो वाहने
हिंजवडी वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या साडेचार महिन्यांत १२०१८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तब्बल ६१ लाख ५६ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे. आयटीपार्क परिसरात १२६ हून अधिक आयटी कंपन्या आहेत. इंजिनिअरिंग, फार्मा व इतर कंपन्या मिळून हा आकडा तीनशेहून अधिक आहे.
आयटीनगरीत दररोज सुमारे तीन लाखांहून अधिक आयटीयन्स येत असतात. जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात हिंजवडी आयटीपार्कने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात आणि दंड भरण्यात येथील आयटीयन्सची संख्या जास्त आहे. आयटीयन्सला नियमांचे वावडे आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास प्रत्येकावर कारवाई होत असते. मग तो कोणीही असो. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडीमध्ये भर पडते. आयटी पार्कमधील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी नियम पाळणे महत्त्वाचे आहे. अन्यथा कारवाई अटळ आहे.
- किशोर म्हसवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
वाहतूक विभाग, हिंजवडी
विना हेल्मेट कंपनीमध्ये प्रवेश दिला जात नाही. हे दुचाकी वापरणाºयांना माहीत आहे. रस्त्यावर दुचाकी पार्क करणे चुकीचे आहे. वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरूच असते. त्यामुळे दुचाकीस्वारांवर चपराक बसेल. आयटीपार्कमधील सर्व दुचाकीस्वारांनी किमान स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरले पाहिजे.
- संदीप देशमुख, आयटी अभियंता