हिरकणी कक्ष कागदावरच
By admin | Published: March 14, 2016 01:26 AM2016-03-14T01:26:33+5:302016-03-14T01:26:33+5:30
महापालिकेतील स्तनदा महिला कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्ष अशा नावाने विश्रांती कक्ष सुरू करण्यास प्रशासनाला वर्षभराच्या प्रतीक्षेनंतरही अद्याप जागा मिळालेली नाही.
पुणे : महापालिकेतील स्तनदा महिला कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्ष अशा नावाने विश्रांती कक्ष सुरू करण्यास प्रशासनाला वर्षभराच्या प्रतीक्षेनंतरही अद्याप जागा मिळालेली नाही. भवन रचना, नागरवस्ती विभाग, कामगार विभाग यांच्यात याअनुषंगाने गेले वर्षभर टोलवाटोलवी सुरू आहे.
राज्य सरकारने सर्व सरकारी कार्यालयांमध्ये असा कक्ष सुरू करण्यासंबंधी वर्षभरापूर्वी आदेश दिले आहेत. मुलांना स्तनपान करण्यासाठी; तसेच गर्भवती महिलांना विश्रांतीसाठी म्हणून असा कक्ष त्वरित सुरू करण्याच्या सूचना त्यात देण्यात आल्या होत्या. त्या त्या सरकारी आस्थापनेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी; तसेच तिथे कामासाठी म्हणून येणाऱ्या नागरिक महिलांसाठीही या कक्षाचा वापर व्हावा, असा हेतू त्यामागे आहे.
महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. कामानिमित्तानेही महापालिकेत दररोज अनेक महिला येत-जात असतात. त्यांच्यासाठी ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. सध्या अशी काहीच व्यवस्था नसल्याने त्यांची अडचण होते. एका पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहायक महिलेने तर मुलाला स्तनपान करता यावे, यासाठी पालिकेच्या समोरच एक खोली भाडेतत्त्वावर घेतली आहे. तिथे दिवसभर सासूला व मुलाला ठेवून ही महिला वेळ मिळेल त्याप्रमाणे तिथे जाऊन परत कार्यालयात येते. कामासाठी येणाऱ्या काही गरीब महिला इमारतीच्या कडेला सावलीत बसून ही गरज भागवतात. हिरकणी कक्ष झाला तर ही अडचण कायमची दूर होणार आहे.
असे असूनही प्रशासनाकडून जागा नाही, असे कारण दाखवत विषय लांबणीवर टाकला जात आहे. सुरुवातीला कामगार विभागाने असा कक्ष सुरू करण्याबाबत नागरवस्ती विभागाला कळवले. त्यांनी भवन रचना विभागाला जागा देण्याबाबत पत्र दिले. काही महिन्यांनी या विभागाने नागरवस्ती विभागाला तुमच्याच कार्यालयातील जागा या कक्षासाठी उपलब्ध करून द्यावी म्हणून कळविले. मग नागरवस्ती विभागाने त्यांना आमच्याकडे अशी जागा उपलब्ध नाही म्हणून कळवले. कामगार कल्याण विभाग अजूनही या दोन कार्यालयांकडून काही होईल म्हणून वाट पाहत आहे. कोणी विषय उपस्थित केला की, वरिष्ठांकडून याबाबत कार्यालयांकडे विचारणा होते व नंतर विषय फाईलबंद होतो. या पत्रव्यवहारातच वर्ष संपले असून, हिरकणी कक्ष मात्र अद्याप कागदावरच आहे.
(प्रतिनिधी)