हिरकणी कक्ष उरले फक्त नावालाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:18 AM2018-08-21T01:18:22+5:302018-08-21T01:18:45+5:30
हिरकणी कक्षाबाबत महामंडळाची उदासीनता आणि मातांनी फिरवलेली पाठ या पार्श्वभूमीवर हिरकणी कक्ष उरले फक्त नावालाच, असे प्रातिनिधिक चित्र राजगुरुनगर आगारात आहे.
राजगुरुनगर : तान्हुल्या बाळांना स्तनपान करता यावे, या हेतूने मातांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना एसटी महामंडळाने केली. मात्र, या हिरकणी कक्षाबाबत महामंडळाची उदासीनता आणि मातांनी फिरवलेली पाठ या पार्श्वभूमीवर हिरकणी कक्ष उरले फक्त नावालाच, असे प्रातिनिधिक चित्र राजगुरुनगर आगारात आहे.
तान्ह्या बाळांना स्तनपान करण्यासाठी एसटीने आपल्या बस स्थानकात हिरकणी कक्षाची निर्मिती केली. मात्र मातांना बसस्थानकात असा कक्ष आहे, याची माहितीच नसल्याचे दिसते. कक्षात जाण्यास माता बिचकतात, हिरकणी कक्ष कुलूपबंद असतो, कक्षात अस्वच्छता आणि अडगळ असल्याचे ठिकठिकाणी दिसते. या परिस्थितीत हिरकणी कक्ष बंद आणि रिकामेच राहत आहेत.
दरम्यान, बसवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गाडी चुकेल या भीतीने हिरकणी कक्षाचा वापर महिलांकडून केला जात नाही. महामंडळामार्फत या कक्षाबाहेर या कक्षाबद्दल माहिती देणारा फलक लावण्यात आलेले नाहीत. शिवाय या सुविधेची उद्घोषणाही केली जात नसल्याचे आढळून आले आहे. हिरकणी कक्षाबद्दल मातांमध्ये उदासीनता आहे. त्यामुळे हिरकणी सुविधेबद्दल महामंडळाला आणखी जागरूकता करावी लागणार असून, हिरकणी कक्ष कुलूपबंद न ठेवता सहज उपलब्ध होतील, असे ठेवावे लागणार आहेत.
योजना प्रभावी राबविण्यास उदासीनता
राजगुरुनगर आगारात प्रवाशी महिलांकडे हिरकणी कक्षाबद्दल विचारले असता याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले. गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी मातांची गैरसोय होत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. हिरकणी कक्ष ही संकल्पना उत्तम असली तरी ही संकल्पना प्रभावीपणे राबवली मात्र जात नाही. वल्लभनगर, राजगुरुनगर, नारायणगाव या बसस्थानकांतील हिरकणी कक्षाबद्दलचे महाराष्ट्रातील प्रातिनिधिक चित्र आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.