मुलानेच काढला वडिलांचा काटा
By admin | Published: May 18, 2017 05:40 AM2017-05-18T05:40:34+5:302017-05-18T05:40:34+5:30
काटेवाडी येथील दिगंबर काटे यांच्या खुनाचा पोलिसांनी चार दिवसांत पर्दाफाश केला असून, मुलानेच कौटुंबिक वादातून वडिलांचा खून केला असल्याचे उघडकीस आले.
- लोकमत न्यूज नेटवर्क
लासुर्णे : काटेवाडी येथील दिगंबर काटे यांच्या खुनाचा पोलिसांनी चार दिवसांत पर्दाफाश केला असून, मुलानेच कौटुंबिक वादातून वडिलांचा खून केला असल्याचे उघडकीस आले.
वालचंदनगर पोलीस व गुन्हे शोध पथक यांनी संयुक्त तपास मोहीम राबवून तपासाचे आव्हान असलेल्या दिगंबर काटे यांच्या खुनाचा छडा लावला.
दिगंबर काटे हे मुलगा अभय यास नेहमी दुय्यम वागणूक देत होते. तसेच, त्याला त्याच्या मनासारखे शिक्षण घेऊ दिले नाही. व्यवसायासाठी कधी आर्थिक मदत केली नाही. वडील दिगंबर काटे यांनी मुलगा अभयची सतत कोंडी करून मानसिक खच्चीकरण केल्याचा राग होता. त्याचबरोबर घरातील कौटुंबिक वादातून निराशेच्या गर्तेत जाऊन शेवटी अभयने चिडून काटेवाडी-कन्हेरी रस्त्यावरील नीरा डाव्या कालव्याच्या भराव्यावर वडिलांचा धारदार सुऱ्याने गळा चिरून त्यांचा मृतदेह पाण्यात टाकून दिला खून केला आहे. हे कळू नये म्हणून तसेच तो अपघात वाटावा, म्हणून दिगंबर काटे यांच्याकडे असलेली मोटारसायकलदेखील नीरा डाव्या कालव्याच्या पाण्यात टाकून दिली. याबाबत पोलिसांनी अभय काटे याला अटक केली आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खून करण्यासाठी वापरलेला सुरा त्याने लपवून ठेवला होता. तो पोलिसाच्या ताब्यात दिला. अभय काटे याला पोलिसांनी बुधवारी (दि. १७ मे) दुपारी साडेचारच्या सुमारास अटक केली गुन्हे शोध विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर याच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, गजानन गजभारे, सुरेंद्र वाघ, गणेश काटकर, प्रवीण वायसे, शिवाजी निकम, बाळासाहेब भोई, संदीप मोकाशी, संदीप जाधव, सुभाष डोईफोडे, संदीप कारंडे, दशरथ कोळेकर, सदाशिव बंडगर, शर्मा पवार, तुषार सानप यांनी तपास केला.
- आरोपी अभय याने वडील दिगंबर काटे यांचा खून करुन मृतदेह नीरा डाव्या कालव्यात टाकल्यानंतर, तो पोलिसांना सणसर गावच्या हद्दीत कालव्यात मिळून आला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेल्यानंतर पोलिसांना अभयची हालचाल संशयास्पद वाटली होती. पोलिसांनी चौकशीचे कौशल्य वापरून त्या दिशेने तपास करुन अभयला विश्वासात घेऊन तपास केल्यानंतर हा खळबळजनक खुनाचा प्रकार उघडकीस आला. त्याने खुनाची कबुली दिली आहे.
फिर्यादी झाला आरोपी...
या खुनाचा तपास अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी संयुक्त तपास करून लावला. खून झालेले दिगंबर दादासाहेब काटे यांचा मृतदेह रायतेमळा सणसर (ता. इंदापूर) येथे सापडला होता.
याप्रकरणी आरोपी म्हणून आज अटक केलेला त्यांचा मुलगा अभय दिगंबर काटे यानेच फिर्याद दिली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी काटेवाडी, भवानीनगर येथे तळ ठोकून वेगवेगळ्या पोलीस पथकामार्फत खुनाचा तपास केला.
त्यामध्ये घरातीलच कोणीतरी यामध्ये आरोपी असल्याचे निदर्शनास आले. अखेर फिर्याद दिलेल्या अभयची चौकशी केली. त्यात त्यानेच वडिलांचा खून केल्याचे उघड झाले. पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी पोलीस पथकांचे अभिनंदन करून बक्षीस जाहीर केले आहे.