इतिहासकारांचे वारकरी संप्रदायाकडे दुर्लक्ष : माधव भंडारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 05:38 PM2018-06-18T17:38:53+5:302018-06-18T17:38:53+5:30
अभ्यासाच्या चौकटीत बसत नाही म्हणून प्रस्थापित इतिहासकारांनी पंढरपूर, वारी आणि वारकरी संप्रदायाकडे दुर्लक्ष केले....
पुणे : महाराष्ट्रातील वारकरी परंपरेचा आजतागायत कधीच विस्ताराने अभ्यास करण्यात आला नाही. पंढरपूरची वारी ९०० वर्षे सुरू आहे. इतकी वर्षे झाली तरी त्याच श्रद्धा आणि निष्ठेने हजारो लोक वारीत येतात हे वारीचे अफाट यश आहे. आपल्या अभ्यासाच्या चौकटीत बसत नाही म्हणून प्रस्थापित इतिहासकारांनी पंढरपूर, वारी आणि वारकरी संप्रदायाकडे दुर्लक्ष केले, अशी खंत महाराष्ट्र राज्य पुनर्वसन समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केली.
उत्कर्ष प्रकाशनतर्फे वा. ल. मंजूळ यांच्या ‘श्री विठ्ठल आणि क्षेत्र पंढरपूर’ या पुस्तकाचे प्रकाशन भंडारी यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ अभ्यसक डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे आणि प्रकाशक सु. वा. जोशी उपस्थित होते.
देगलूरकर म्हणाले,‘मूर्तिशास्त्राप्रमाणे तिरुपती बालाजीची मूर्ती ही भोग मूर्ती आहे. मारुती आणि महिषासूर मर्दिनी ही वीर मूर्ती, तर विट्ठल ही योग मूर्ती आहे. विठ्ठल जसा आहे तसा तो प्रत्येकाला दिसत नाही, हेच या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे. शैव आणि वैष्णव पंथाला एकत्र आणणाऱ्या विठ्ठलाला ‘हरिहर’ म्हणतात. डोक्यावर शिवलिंग असल्याने विठ्ठल हा हर वाटतो. अनुत्तीर्ण मुलाला आपण उपरोधाने शंख म्हणतो. पण, विठ्ठलाच्या हातातील शंख हे ज्ञानाचे प्रतीक आहे. काहींच्या मते विठ्ठल हा पितांबरधारी तर काहींच्या मते दिगंबर आहे. धोतराचा सोगा स्पष्टपणे दिसतो. शिल्पकाराच्या कौशल्यामुळे मूर्ती श्वेतांबर असूनही दिगंबर वाटते. विठ्ठलाती मूर्ती प्रत्येकाला दिसते, पण ती कळते असे होत नाही.’
ढेरे म्हणाल्या, ‘ मंजूळ यांच्याकडे ग्रंथाचे मोल जाणण्याचे ज्ञान व चिकित्सक वृत्ती आहे. आपल्या गावाची महत्त्वाची स्थाने, मोठया व्यक्तींची घरे यासह प्रत्येकाची गावाशी नाळ जुळणे गरजेचे आहे. पूजेचे नैमित्तिक उपचार, भक्त आणि भाविकता, अन्य प्रांतातील विठ्ठल भक्ती, परंपरा या माध्यमातून जिवंत देव आपल्याला या पुस्तकातून भेटतो. सात शतकांच्या महाराष्ट्राचा भावकोश या दैवताने जागविला.’
सु. वा.जोशी यांनी प्रास्ताविक केले. दीपक करंदीकर यांनी आभार मानले.