ऐतिहासिक निर्णय ! पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर असणार वैद्यकीय अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 02:59 PM2020-11-23T14:59:46+5:302020-11-23T15:00:33+5:30
येत्या १ डिसेंबरला पदवीधर निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे.
पुणे: राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून राष्ट्रवादी, भाजप, मनसे या राजकीय पक्षांसह सर्वच उमेदवारांचा धूम धडाक्यात प्रचार सुरु आहे. विजयासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. परंतु, याचदरम्यान राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. येत्या १ डिसेंबरला पदवीधर निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर एक महत्वाचा निर्णय घेतला असून पुण्यात मतदान केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी पदवीधर निवडणुकीसाठी निवडणूक आयोग व प्रशासनाकडून विविध पावले उचलली जात आहे. त्याचाच एक
भाग म्हणून मतदानकेंद्रावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. आजपर्यंत निवडणुकीच्या इतिहासात अशाप्रकारे वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसने अरुण लाड आणि मनसेकडून रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे. तसेच पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ६२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. राष्ट्रवादी, भाजप आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांकडून युद्ध पातळीवर तयारी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख म्हणाले, या निवडणुकीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला देखील मतदानाच्या दिवशी शेवटच्या एक तासात मतदानाच हक्क बजावता येणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या धर्तीवर मतदान केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय पीपीई कीट, सॅनिटायझर, औषध-गोळ्यांची सोय केली जाणार आहे.