ऊसतोड कामगारांबाबत ऐतिहासिक निर्णय; शरद पवारांसोबत पंकजांची बैठक यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 11:13 PM2024-01-04T23:13:41+5:302024-01-04T23:36:10+5:30
ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंकजा मुंडेंनी दिली आहे.
पुणे - भाजपात गेल्या अनेक दिवसांपासून नाराज मानल्या जात असलेल्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नेहमीच ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावरुन आवाज उठवला आहे. ऊसतोडकामगारांच्या प्रश्नासंदर्भाने अनेकदा विविध मागण्याही त्यांनी केल्या आहेत. स्वर्गीत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर वडिलांची धुरा सांभाळून ऊसतोड कामगारांसाठी त्यांनी नेतृत्व केलं आहे. त्याच अनुषंगाने आज ऊसतोड कामगार लवादाची बैठक आज पार पडली. या बैठकीत ऊसतोड मजुरांसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंकजा मुंडेंनी दिली आहे.
ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर आज पुण्याच्या साखर संकुलात राष्ट्रवादीचे प्रमुख व जेष्ठ नेते शरद पवार यांच्या आणि पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत ऊसतोड कामगार लवादाची बैठक पार पडली. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर आज प्रथमच ऊसतोड मजुरांच्या न्याय मागण्यांची पूर्तता करणारा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे पंकजा मुंडेंनी सांगितले, तसेच याबाबत समाधानही व्यक्त केले. महाराष्ट्र सहकारी साखर कारखान संघाचे अध्यक्ष या नात्याने शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला जयंत पाटील हेही उपस्थित होते.
ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर आज पुण्याच्या साखर संकुलात जेष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या आणि माझ्या प्रमुख उपस्थितीत पवार साहेबांच्या आणि माझ्या ऊसतोड कामगार लवादाची बैठक पार पडली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनंतर आज प्रथमच ऊसतोड मजुरांच्या न्याय मागण्यांची पूर्तता करणारा… pic.twitter.com/PXKnss0UlK
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 4, 2024
ऊसतोड मजुरांना 34% दरवाढ तर मुकादमांना 01% कमिशन वाढ देण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला, त्यावर आनंद व्यक्त करत पंकजा मुंडेंनी बैठकीचा वृत्तांत दिला. तसेच, राज्यातील ऊसतोड मजुरांचे हित हे माझ्यासाठी सर्वतोपरी आहे. आजच्या बैठकीतही मी त्याच भूमिकेतून माझे विचार मांडले. राज्यातील ऊसतोड मंजूर बांधव आणि संघटनांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून माझ्या भूमिकेला पाठींबा दिला आणि लवादाचा निर्णय मान्य केला, त्यासाठी सर्वांचे आभार मानते आणि सर्व ऊसतोड मजूर बांधवांचे अभिनंदन करते, असे पंकजा यांनी या बैठकीनंतर म्हटले आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियातून बैठकीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, आपल्या भावनाही त्यांनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या आहेत.