ऐतिहासिक ब्रिटिशकालीन अमृतांजन पुलाची द्विशतकाकडे वाटचाल........
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 12:58 PM2019-11-13T12:58:43+5:302019-11-13T13:00:46+5:30
इतिहासाची साक्ष देणारा पूल : पुणे-रायगडला जोडणारा दुवा झाला १८९ वर्षांचा
- विशाल विकारी
लोणावळा : पुणे व रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा ऐतिहासिक ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल हा रविवारी तब्बल १८९ वर्षांचा झाला. इतिहासाची साक्ष देणारा हा पूल आजही मोठ्या रुबाबात येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्वागत करत आहे.
पुणे व रायगड जिल्ह्याला जोडणारा हा ऐतिहासिक पूल खंडाळा घाटात इंग्रज अधिकारी सर कॅप्टन ह्युजेस यांनी मेजर जनरल जॉन मालकोल्म जी.सी.ई. अॅनो डोमिनी यांच्या मार्गदर्शनाखाली १८३० मध्ये बोरघाटातील रेल्वेच्या रिव्हसिंग पॉइंट येथे बांधला. १० नोव्हेंबर १८३० मध्ये या पुलाचे लोकार्पण झाले होते. पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेला हा प्राचीन पूल ब्रिटिश काळात जेव्हा दळणवळणाची साधने नव्हती त्या काळात ब्रिटिशांनी सह्याद्रीची नाळ कोकणाशी जोडण्यासाठी बांधला होता. खंडाळा बोर घाटातील या पुलांवर वेदनानाशक अमृतांजन बामची जाहिरात काही काळ झळकल्यानंतर या पुलाला अमृतांजन पूल हे नाव पडले होते.
रस्ते महामंडळाकडून पूल जुना झाल्याने पाडण्याच्या हालचाली
अमृतांजन पुलावरून पूर्वी वाहतूक होत असे कालांतराने हा पूल जीर्ण झाल्याने त्याला समांतर दुसरा पूल बांधण्यात आला आहे. या पुलावर उभे राहिले असता निसर्गरम्य खंडाळा घाटातील विहंगम दृष्य, नागफणीचा डोंगर व सुळका, बोगद्यांतून बाहेर पडणारी रेल्वेगाडी आदींचे दर्शन होते. पर्यटकांसाठी तो एक महत्त्वाचा पिकनिक स्पॉट तसेच सेल्फी पॉइंट बनला आहे. मुंबई व कोकणातील जीवघेण्या गरमीमधून आल्यानंतर याच ठिकाणी सह्याद्रीच्या अल्हाददायी वातावरणाचे व थंड हवेचे चुणूक जाणवते.
मागील काळात हा ऐतिहासिक पूल वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे कारण देत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र माध्यमांनी या विरोधात उठविलेला आवाज व नागरिकांच्या हरकतीनंतर निर्णय थांबविण्यात आला. सध्या लोणावळा ते खालापूर दरम्यान मिसिंग लिंकचे काम सुरू असल्याने अमृतांजन पुलाला सध्या तरी कोणता धोका नाही. इतिहासाची साक्ष देणारा तसेच दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या अमृतांजन पुलाची ऐतिहासिक वारसा यादी नोंद करत त्याचे जतन व संगोपन करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.