ऐतिहासिक, सांस्कृतिक पुण्यात देव कुलूपबंद कसे?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 02:03 PM2022-11-11T14:03:35+5:302022-11-11T14:05:18+5:30
एका मंदिराच्या दर्शनाला जावे आणि तिथे अन्य मंदिरे मिळावीत असे अनेकदा झाले...
- राजू इनामदार
पुणे : शहरात असंख्य मंदिरे आहेत. इतकी की, पुण्याला देवळांचे शहर म्हणावे; पण बहुतेक देवालयांमधील देव कुलूपबंदच असतो. कारण ९० टक्के मंदिरे खासगी मालकीची आहेत. ही निरीक्षणे आहेत शरद व पौर्णिमा सोमण या आजीआजोबांची. या आजी-आजोबांनी चातुर्मासात पुण्यातील एक देऊळ व तेथील देवदर्शन असा नेम पाळला. १२० दिवसांमध्ये १२० देवळे पाहिली. ती परिसरातील होती तशीच काही घरापासून दूरवरचीही. या मंदिरफेरीतील सोमण यांचे अनुभव ऐकण्यासारखे आहेत.
एका मंदिराच्या दर्शनाला जावे आणि तिथे अन्य मंदिरे मिळावीत असे अनेकदा झाले. सोमवार पेठेत दत्ताच्या दर्शनाला गेलो तेथेच पलीकडे एका देवीचे देऊळ सापडले. शेजारीच नागेश्वर हे शंकराचे मंदिर आहे. त्याच आवारात दत्त, गणपती, मारुती यांची मंदिरे सापडली. तीच गोष्ट रास्ता पेठेतही. रास्ते वाड्यातील दत्ताच्या दर्शनाला आम्ही गेलो, तेथेच राम मंदिरही आहे. थोडे पुढे आलो की उंटाडे मारुती, मद्रासी गणपती अय्यप्पा मंदिर अशी मंदिरेच मंदिरे पेठांमध्ये आहेत.
असा आला अनुभव
- बहुसंख्य देवळे खासगी मालकीची आहेत. काळाच्या ओघात तिथे डेव्हलपमेंट झाली; पण बऱ्याच मालकांनी जुन्या मंदिराचे अस्तित्व कायम ठेवून मगच विकास केला. खुन्या मुरलीधरासमोरील कृष्णेश्वर सोसायटी, लक्ष्मी रस्त्यावरील जुन्नरकर दत्त मंदिर, कुमठेकर रस्त्यावरील ताई रास्ते राम मंदिर इथे हा अनुभव आला.
- सार्वजनिक उत्सवाच्या मूर्ती बसवलेली नवी मंदिरे या दांपत्यानेच टाळली. त्यामुळे शहरातील जुन्या मंदिरांचे एक सर्वेक्षणच त्यांच्याकडून झाले आहे. मंदिरे कुलूपबंद का असतात? याची त्यांनी चौकशी केली असता असे कळले की, मंदिर खुले ठेवले तर पाळीव प्राणी, वेडेपीर यांचा त्रास होतो म्हणून बंद ठेवली जातात. पूजाअर्चा मात्र सर्व मंदिरांत वेळच्या वेळी होते. पारंपरिक उत्सव साजरे केले जातात. पिढ्यान पिढ्यांची परंपरा मोडायची नाही हे कटाक्षाने पाळले जाते, असे सोमण म्हणाले.
नावांमधील विविधता
- ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी, दगडूशेठ दत्तासमोर काळी जोगेश्वरी, फडगेट पोलीस चौकीमागे पिवळी जोगेश्वरी, कुंटे चौकाजवळ दाढीवाला दत्त, कसबा गणपती समोरील काळा दत्त, शिवाजी रोडला जाईचा गणपती, बेलबागेत विष्णूचे मंदिर होते, म्हणून बाजीराव रोडवरील विष्णू, नवा विष्णू म्हणून प्रसिद्ध झाला.
- शनिवार वाड्यासमोर प्रेमळ विठोबा, भरतनाट्य मंदिराजवळ उपवासी विठोबा, नाना पेठेत निवडुंग्या विठोबा, भवानी पेठेतील पालखी विठोबा. भांग्या मारुती, पत्र्या मारुती, दुध्या मारुती, जिलब्या मारुती.
- मोदी गणपती, माती गणपती, चिमण्या गणपती, त्रिशूंड्या गणपती, शिवाजी रोडवर लाकडी गणपती. एक गुडघे मोडी मातेचे मंदिर आहे. लक्ष्मी रोडवर सोट्या म्हसोबा आहे. खजिना विहिरीजवळ पुण्यातील एकमेव नरसिंह मंदिर व त्याच्यासमोर पुणे विद्यार्थीगृहाच्या शाळेमध्ये असलेले श्रीराम लक्ष्मणाचे मंदिर आहे, यात सीता नाही.