काय सांगता! चिखली येथे खोदकाम करताना सापडला इतिहासकालीन सोन्याच्या नाण्यांचा हंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 03:04 PM2021-03-09T15:04:28+5:302021-03-09T15:05:51+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथे ही सोन्याची नाणी आढळली आहेत.
पिंपरी : बांधकामासाठी खोदकाम करताना इतिहास कालीन सोन्याच्या नाण्यांचा हंडा सापडला. पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथे ही सोन्याची नाणी आढळली आहेत. ५२६ ग्रमच्या कांस्य धातूसारखा तुटलेला तांब्यामध्ये २३५७ ग्रॅम वजनाची २१६ नाणी जप्त करण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक जमीर तांबोळी यांना माहिती मिळाली, सलाम सालार खॉं पठाण (रा. विठ्ठल नगर झोपडपट्टी, नेहरूनगर, पिंपरी) याने त्याच्या घरात सोन्याची नाणी बाळगली आहेत. त्यानुसार पोलिसांनी पठाण याच्या घरातून नाणी जप्त केली.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, पठाण याचे सासरे मुबारक शेख, मेव्हणा इरफान शेख (दोघेही रा. पाथरी, जि. परभणी) हे तीन ते चार महिन्यांपूर्वी मजुरीच्या कामासाठी पठाण याच्याकडे आले होते. ते दोघे चिखली येथील बांधकामावर बिगारी म्हणून काम करीत होते. तेथे खोदकामाची माती फावड्याने भरत असताना सोन्याची पाच सहा जुनी नाणी त्यांना मातीत मिळून आली. ती नाणी त्यांनी सदाम पठाण याला दाखवली. दुसऱ्या दिवशी सदाम पठाण व त्याचा मेव्हणा मुबारक शेख यांनी मातीचा ढीग उकरून कांस्य धातूसारखा तांब्या व सोन्याची नाणी मिळाली. ती नाणी त्यांनी सदाम याच्या घरी आणून ठेवली होती.
इतिहास कालीन ही नाणी १७२० ते १७५० या कालखंडातील आहेत. त्यावर उर्दू व अरबी भाषेत राजा मोहम्मद शाह यांची मुद्रा उमटविण्यात आली असल्याची पुरातत्त्व विभागाकडून माहिती मिळाली आहे.
नाण्यांच्या वाटपावरून वाद झाल्याने उघडकीस
सापडलेली नाणी कोणी किती घ्यायची यावरून सदाम पठाण आणि शेख यांच्यात वाद झाला. सुमारे तीन महिन्यांपासून वाटपावरून वाद सुरू होता. त्यावरून पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी नाणी जप्त केली. सोन्याच्या सध्याच्या बाजारभावाने एका नाण्याची किंमत ७० हजारांपर्यंत आहे. मात्र पुरातन असल्याने नाणी मौल्यवान असल्याचे सांगितले जाते आहे.
युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस कर्मचारी केराप्पा माने, दिलीप चौधरी, शिवानंद स्वामी, प्रमोद वेताळ, दीपक खरात, उषा दळे, जयवंत राऊत, वसंत खोमणे, विपूल जाधव, जमीर तांबोळी, नामदेव राऊत, अजित सानप, नामदेव कापसे, आतिष कुडके, शिवाजी मुंढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.