पुरातन बाबीरबुवांच्या यात्रेला ऐतिहासिक वारसा
By Admin | Published: March 31, 2017 02:14 AM2017-03-31T02:14:30+5:302017-03-31T02:14:30+5:30
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रूई गावाला समृध्द परंपरा आहे. बाबीर रूई गाव हे अतिशय सुंदर
कळस : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रूई गावाला समृध्द परंपरा आहे. बाबीर रूई गाव हे अतिशय सुंदर व निसर्गरम्य निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेले, इतिहासाची समृद्ध परंपरा असलेले गाव आहे. डोंगररांग परिसर, गावातील अतिशय रम्य डोळ्यांचे पारण फेडणारा डोंगराळ भाग, काळेभोर पाषाण, दगड, हिरवागार निसर्ग, स्वच्छ ताजी भरपूर हवा,अतिशय पुरातन असलेल्या या जागेवर बाबीर मंदिर आहे.
बाबीरदेव हा ऐतिहासिक गाव रूईचा अनमोल ठेवा. फार पुरातन कालावधीतील डोंगरावर उंचीवर बाबीर देव आहे. त्या तेथे दगडी बांधकाम केलेले भव्य मंदिर आहे. मंदिरामध्ये एक इलुमाता व बाबीरदेव यांच्या मूर्ती आहेत. या देवावर पशुपालक लोकांची फार श्रद्धा आहे. त्यांच्यापासून रूईचा इतिहास बदलला. या देवांमुळे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश लोक दर्शनासाठी येतात. याची महती एवढी वाढली आहे, की परदेशातूनही लोक येऊ लागले आहेत. या देवाबद्दल तशा अनेक दंतकथा व लोककथा प्रसिद्ध आहेत.
बाबीरदेवाची आई येलुमातेने १२ वर्षे शिवभक्ती केली. तेव्हा शिवाने प्रसन्न होऊन तिच्या पोटी जन्म घेतला. गायी चारत असताना बासरी वाजली की सर्व बाबीरदेवाभोवती गोळा होत, असे सुरू असताना एके दिवशी काही लोक जे लुटारू होते, त्यांनी बाबीरदेवावर हल्ला केला. त्या वेळी त्यांचे वय फक्त १२ वर्षे होते. त्या वेळी धाडसाने आलेल्या परिस्थितीला तोंड देत लढाई केली. त्यात त्यांना वीरमरण आले. त्या जागेला सायाळीचे बिळ म्हणतात. ती गुहा आजही आहे, अशी आख्यायिका आहे. त्या काळी चालत असलेल्या प्रथेप्रमाणे बाबीरबुवांचे वीरगळ बांधले. (वार्ताहर)
जुने जाणते लोक सांगतात की, मंदिर बांधकाम करताना त्या वेळी समाधी उघडली असता त्यात काठी घोंगड्याचे काही भाग पाहायला मिळाले. त्यांच्या वीरमरणास अभिवादन म्हणून लोक दीपावली पाडवा, माघ पौर्णिमा व गुढीपाडव्याला दर वर्षी जमतात. तसेच ज्यांना दिवाळीतील यात्रेला येणे शक्य होत नाही, ते फेब्रुवारी महिन्यातील माही पौर्णिमेच्या यात्रेत येतात. यात्रेमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. घोंगडी बाजारपेठ, लाकडी खेळणी यामध्ये दिवाळी पाडव्याला मोठी उलाढाल होते. पारंपरिक गजेढोल स्पर्धा भरवली जाते. तसेच माघी यात्रेला जंगी कुस्ती आखाडा भरतो. गुढीपाडव्याला अखंड हरिनाम सप्ताह होतो. तसेच भाकणूक सांगितली जाते.