गौैरवग्रंथाला ऐतिहासिक मोल
By admin | Published: March 4, 2016 12:13 AM2016-03-04T00:13:17+5:302016-03-04T00:13:17+5:30
थोर व्यक्तींचा चरित्र गाभा फक्त त्यांच्या भोवतीच्या लोकांपुरताच महत्त्वाचा नसतो. तो त्या विशिष्ट काळचा दस्तावेज असतो
पुणे : थोर व्यक्तींचा चरित्र गाभा फक्त त्यांच्या भोवतीच्या लोकांपुरताच महत्त्वाचा नसतो. तो त्या विशिष्ट काळचा दस्तावेज असतो. ‘विस्मरणातील नायक’ हा गौरवग्रंथ म्हणजे एका व्युप्तन्न व्यक्तिमत्व लाभलेल्या व्यक्तिमत्त्वाचा व त्या काळचा आराखडा असल्यानेच त्यास मोठे ऐतिहासिक मोल आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांनी काढले.
‘विस्मरणातील नायक-कृष्णाजी गणेश सबनीस’ या सबनीस यांच्या कुटुंबीयांनी काढलेल्या गौरव ग्रंथाचे, ई-बुकचे आणि त्यांच्यावरील टपाल तिकिटाचेही प्रकाशन रानडे यांच्या हस्ते करण्यात आले.
सबनीस यांचे विद्यार्थी व ज्येष्ठ नाटककार प्रा. दिलीप जगताप, सुधा सबनीस, अशोक, विजय आणि विवेक सबनीस, मंदार जोगळेकर उपस्थित होते. ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, गायक विजय सरदेशमुख, लेखिका भारती पांडे, इतिहास अभ्यासक डॉ. राजा दीक्षित आदींनीही हजेरी लावली.
१९४० च्या दशकात प्रतिभा रानडे यांचे वडील गणेश रंगो भिडे आणि सबनीस हे कोल्हापूरातील हरिहर विद्यालयात शिक्षक होते. भिडे यांच्या व्यावहारिक ज्ञानकोशात सबनीसांचा सक्रिय सहभाग होता. रानडे म्हणाल्या की, सबनीस सर शाळेत विद्यार्थ्यांना फक्त परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी शिकवत नसत. त्यांचा सर्वांगीण विकास करत देशाचे उत्तम नागरिक बनवायचे असा ध्यास असणारे कृष्णराव गणेश सबनीस उर्फ दादा हे गेल्या पिढीतील ध्येयवादी व विद्यार्थिप्रिय शिक्षक होते. (प्रतिनिधी)