अनुभवला मुठेचा इतिहास
By admin | Published: October 5, 2015 01:34 AM2015-10-05T01:34:14+5:302015-10-05T01:34:14+5:30
मुठा नदीचा इतिहास आणि नदीकाठची पूर्वीची जैवविविधता याबद्दल माहिती पुणेकरांनी रविवारी जाणून घेतली. निमित्त होते मुठाई महोत्सवांतर्गत आयोजित केलेल्या नदीफेरीचे.
पुणे : मुठा नदीचा इतिहास आणि नदीकाठची पूर्वीची जैवविविधता याबद्दल माहिती पुणेकरांनी रविवारी जाणून घेतली. निमित्त होते मुठाई महोत्सवांतर्गत आयोजित केलेल्या नदीफेरीचे.
मुठाई महोत्सवांतर्गत सिद्धेश्वर घाट परिसरात नदीफेरीचे आयोजन करण्यात आले होते. जनवाणीच्या हेरिटेज वॉक या संकल्पनेवर आधारित जीवितनदी आणि जनवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. उत्साही पुणेकरांनी यात सहभाग घेतला.
फेरीच्या सुरुवातीला भूशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्र या विषयाचे गाढे अभ्यासक डॉ. शरद राजगुरू यांनी मुठा नदीचा इतिहास आणि नदीकाठची पूर्वीची जैवविविधता याबद्दल माहिती दिली. मुठेकाठी मानवी संस्कृती कशी विकसित होत गेली याचीही रोचक माहिती दिली. पुराव्यादाखल त्यांनी आणलेले जीवाश्माचे नमुने आणि पुरातन मानवाची हत्यारे हे या फेरीचे विशेष आकर्षण ठरले.
नदीफेरीमध्ये मुठेचा उगम, मुठेकाठच्या जैवविविधतेतील बदल, मुठेतील प्रदूषण, मुठा वाचविण्यासाठी काय करता येईल अशा विविध विषयांवर माहिती देण्यात आली. या नदीफेरीचे आयोजन दर रविवारी सहा महिने करण्यात येणार आहे.
नदीची निर्मिती, इतिहास, नदीमध्ये काय काय बदल होत गेले याची माहिती देणारे एक प्रदर्शन दि. ६ ते ८ आॅक्टोबर या कालावधीत राजा रविवर्मा कलादालनात भरविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)