मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास झळकणार

By admin | Published: January 8, 2016 01:43 AM2016-01-08T01:43:29+5:302016-01-08T01:43:29+5:30

घुमानच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठ्यांच्या महाराष्ट्राबाहेरील पराक्रमांचा इतिहास एकत्रित करण्याचा विषय चर्चेस आला होता.

The history of the history of Maratha will be visible | मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास झळकणार

मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास झळकणार

Next

पुणे : घुमानच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठ्यांच्या महाराष्ट्राबाहेरील पराक्रमांचा इतिहास एकत्रित करण्याचा विषय चर्चेस आला होता. ही जबाबदारी साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे माझ्यावर सोपवण्यात आली आहे. ते काम मी युद्धपातळीवर हाती घेतले आहे. भाषिक धोरणाच्या मसुद्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. संमेलनानंतर वर्षभरात ३०० हून अधिक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला असल्याचे ८८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी सांगितले.
घुमानमधील साहित्य संमेलनातील घोषणा आणि संमेलनाची फलनिष्पत्ती यांचा आढावा त्यांनी घेतला. या वेळी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, कोशाध्यक्ष सुनील महाजन, रामदास फुटाणे, माजी स्वागताध्यक्ष भारत देसडला, सरहद संस्थेचे संजय नहार, घुमानचे माजी सरपंच हरबन्ससिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
मोरे म्हणाले, ‘‘साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा गुळाचा गणपती नसतो. अध्यक्षाचे महत्त्व व्यक्तिसापेक्ष असते. घुमानला झालेल्या संमेलनानंतर मी वर्षभरात केलेल्या कामांबाबत समाधानी आहे. संत नामदेवांच्या नावाने पुरस्कार दिला जावा, यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाशी बोलणी सुरू आहेत. गुलाबमहाराजांची समाधी स्थापन करण्यासाठी नगर विकास खात्यातर्फे प्रक्रिया सुरू आहे. महात्मा जोतीराव फुले यांचे मराठी भाषेतील कार्य सामान्यांसमोर यावे, अशी अपेक्षा मी घुमानच्या संमेलनामध्ये व्यक्त केली होती. त्यानुसार महात्मा फुले यांच्या समग्र वाङ्मयाचे विश्लेषण करून वेगळे पुस्तक लिहीत आहे. ’’
घुमान येथे आयोजित ८८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये संत नामदेवमहाराजांच्या नावाने महाविद्यालय सुरू व्हावे, अशी सूचना करण्यात आली होती. या महाविद्यालयाच्या बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात असून, एप्रिलपासून ते खुले करण्यात येईल. बाबा नामदेव डिग्री कॉलेजचे उद्घाटन पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. घुमानमध्ये संत नामदेव अध्यासन स्थापन केले जाणार आहे. त्यासाठी तिथे जाऊन काम करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे, असेही या वेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The history of the history of Maratha will be visible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.