महत्त्वाच्या संस्थांचा इतिहास जाेपासायला हवा : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 05:50 PM2019-06-23T17:50:58+5:302019-06-23T17:57:48+5:30
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या स्मृतिचित्रे या काॅफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
पुणे : अनेक देशांमध्ये महत्त्वाच्या संस्थांची माहिती देणारे संग्रह, संस्थेचा इतिहास याचे जतन केले जाते. आपल्या देशात संस्थांचा इतिहास फारासा संभाळला जात नाही. महत्त्वाच्या संस्थांचा इतिहास जाेपसायला हवा, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या स्मृतिचित्रे या काॅफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी खासदार गिरीश बापट, महापाैर मुक्ता टिळक, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभाेर आदी मंचावर उपस्थित हाेते.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनाेगतात संघाने तयार केलेल्या काॅफीटेबल बुकचे काैतुक केले. तसेच पत्रकारांच्या विविध समस्यांवर सरकारकडून उपाययाेजना करण्यात येतील असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री म्हणाले, अनेक संस्था माेठं काम करतात. परंतु त्यांचा इतिहास जाेपासणं हे आपल्या देशात फारसं सांभाळलं जात नाही. जगातील प्रत्येक संस्थेमध्ये संस्थेची आठवण, प्रवास जतन करुन ठेवला जाताे. ही आठवण संस्था कुठल्या धाेरण, ध्येय्य करता उभी केली, तिची वाटचाल काय आहे ? तिचा संघर्ष काय आहे ? या गाेष्टीची माहिती देत असते. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना संस्थेचे मूळ तत्त्व कायम राखण्याकरीता ही आठवण मदत करत असते. संघर्षाच्या प्रसंगात ही आठवण महत्त्वाची असते. त्यातून मार्ग मिळत असताे. पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इतिहास माेठा आहे. स्वातंत्र्य पूर्वीचा काळ, स्वातंत्र्यानंतरचा काळ आणि आधुनिक काळ हा या पत्रकार संघाने पाहिला आहे. व्यवस्थेला हलविणाऱ्या अनेक दिग्गज पत्रकारांचा इतिहास या संघाशी जाेडला गेलेला आहे.
पत्रकारांसाठी सरकारने तयार केलेल्या याेजनांबाबत फडणवीस म्हणाले, 25 काेटी रुपये हे पत्रकारांच्या पेन्शनसाठी ठेवण्यात आलेले आहेत. तसेच महात्मा फुले आराेग्य याेजनेअंतर्गत पत्रकारांना माेफत उपचार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पत्रकारांच्या घराच्या प्रश्नाबाबत म्हाडाच्या माध्यमातून खास याेजना सरकार तयार करेल असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
गिरीश बापट म्हणाले, पत्रकार संघ हा केवळ बातम्या देणारा संघ नाही तर प्रबाेधन देखील करणारा संघ आहे. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात पत्रकार संघाचे माेठे याेगदान आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रशांत आहेर यांनी केले.