‘पानशेत’च्या इतिहासातून धडा मिळेल
By admin | Published: July 13, 2016 12:25 AM2016-07-13T00:25:28+5:302016-07-13T00:25:28+5:30
पानशेत पूरग्रस्तांचा लढा, उभारण्यात आलेले जनआंदोलन, पुनर्वसनासाठी केलेला संघर्ष या सर्व गोष्टींमधून पानशेत पूराचा संपूर्ण इतिहास ‘कहाणी पानशेत पूरग्रस्तांची’ यामध्ये कथन झाला आहे.
पुणे : पानशेत पूरग्रस्तांचा लढा, उभारण्यात आलेले जनआंदोलन, पुनर्वसनासाठी केलेला संघर्ष या सर्व गोष्टींमधून पानशेत पूराचा संपूर्ण इतिहास ‘कहाणी पानशेत पूरग्रस्तांची’ यामध्ये कथन झाला आहे. त्यामुळे या पुस्तकाचा एखाद्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे उपयोग होईल आणि त्यातून सगळे धडा घेतील, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
पानशेत धरण फुटून आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या पुरग्रस्तांच्या समस्या व त्याच्या निराकरणासाठी केलेले प्रयत्न, पाठपुरावा या सर्वांची माहिती देणारे मंगेश खराटे लिखित ‘कहाणी पानशेत पूरग्रस्तांची’ या पुस्तकाचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार मेधा कुलकर्णी, राज्याचे माजी मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, उपमहापौर मुकारी अलगुडे, शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर अंकुश काकडे, माजी नगरसेवक शिवराम मेंगाळे व लेखक मंगेश खराटे आदी उपस्थित होते.
बाळासाहेब शिवरकर आणि डॉ. पतंगराव कदम यांनी राजकीय गुपित खोलत हास्याची फटकेबाजी केली. सत्ता कुणाचीही असो, सहज असे काहीच होत नाही. वरिष्ठ असूनही मलाही हातात फाईल घेऊन फिरावे लागले होते, अशी मिश्किल टिप्पणी कदम यांनी केली.
सत्ताधारी पक्षाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनाही त्यांनी भाषणात शाब्दिक चिमटा काढला. मंगेश खराटे यांचा व्यवसाय खाटीकाचा. या आपल्या बंधूकडे त्या अधूनमधून जात असतं असे म्हणाले. मटणाचा खिमा मंगेश करतो, यावरून तुम्हीच आता समजून घ्या, असे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालनकेले. (प्रतिनिधी)