पुण्यातील गणेश मंडळांच्या नावातून झळकतो इतिहास; समाजासमोर ठेवला जातो आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 01:35 PM2020-08-28T13:35:57+5:302020-08-28T13:38:49+5:30

पुण्याच्या मध्यवर्ती भागात वैविध्यपूर्ण नाव असलेली असंख्य मंडळे आहेत.

History shines through the names of Ganesh Mandals in Pune | पुण्यातील गणेश मंडळांच्या नावातून झळकतो इतिहास; समाजासमोर ठेवला जातो आदर्श

पुण्यातील गणेश मंडळांच्या नावातून झळकतो इतिहास; समाजासमोर ठेवला जातो आदर्श

googlenewsNext
ठळक मुद्देकाहींच्या नावातूनच समाजासमोर ठेवला जात आहे आदर्श

अतुल चिंचली- 
पुणे: पुण्यात हजारोंच्या संख्येत मंडळे आहेत. या सर्व मंडळांची नावे वेगवेगळी आहेत. काही मंडळांच्या नावात तालीम, मारुती मंदिर, विहीर अशा गोष्टींचा उल्लेख आहे. तर काहींच्या नावातूनच समाजासमोर आदर्श ठेवला जात आहे. अशा अनेक मंडळांच्या नावातून इतिहास दर्शवला जातो. असे चित्र समाजासमोर निर्माण झाले आहे. 
पुण्याच्या मध्यवर्ती भागात वैविध्यपूर्ण नाव असलेली असंख्य मंडळे आहेत. आदर्श सेवा मंडळ, सेवा मित्र मंडळ, आदर्श मंडळ, अशा मंडळांच्या नावातून सेवेचा संदेश समाजापुढे मांडला जातो. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बाबूगेनू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ, गुरुवर्य जगोबादादा वस्ताद तालीम मंडळ अशा मंडळाच्या नावातून त्या समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिकाचे कार्य समाजासमोर येते. उंबऱ्या मारुती मंडळ, पत्र्या मारुती मंडळ, डुल्या मारुती मंडळ, अकरा मारुती कोपरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जिलब्या मारुती मंडळ, निंबाळकर तालीम मंडळ, कडबे आळी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नगरकर तालीम मंडळ, गायकवाड तालीम मंडळ अनेक मंडळांना पेशवेकालीन मारुती मंदिरावरून नावे देण्यात आली आहेत. तर काहींना तालीम वरूनही मंडळाचे नाव देण्यात आले आहे. नवग्रह मंडळ, ऑस्कर मित्र मंडळ, तरुण अशोक मंडळ, वीर शिवराज मंडळ, भारतमाता मित्र मंडळ, साईनाथ मंडळ, होनाजी तरुण मंडळ, श्री गरुड गणपती मंडळ अशा नावांचे वेगळेपणही दिसून येते. 
 गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नावांच्या इतिहासाविषयी 'लोकमत' ने मंडळाशी संवाद साधला.

सदाशिव पेठेतील खजिना विहीर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ओम कासार म्हणाले, 
या भागात खजिना विहीर ही पेशवेकालीन विहीर होती. पेशव्यांच्या काळात पुण्यात सगळीकडे पाणी नसले तरी या विहिरीत पाणी असायचे. त्यावरून हिला खजिना विहीर असे नाव पडले. आमच्या मंडळाच्या गणपतीची स्थापना इथेच झाली. म्हणून मंडळालाही हे नाव देण्यात आले. 

....................

लक्ष्मी रस्त्यावर डुल्या मारुती चौकात पेशवेकालीन मारुतीची मूर्ती होती. माजी गव्हर्नर हरिभाऊ पाटसकर या मूर्तीची पूजा करत असे. त्यांनीच या मारुतीला आणि मंदिराला डुल्या मारुती असे नाव दिले आहे. या मंदिरामुळे मंडळाचे नाव डुल्या मारुती मंडळ ठेवण्यात आले. 
                           किरण पुणतांबेकर 
                                उपाध्यक्ष 
.................................................................. 
पेशवेकाळात या गल्लीत कडबा विक्री केली जात होती. त्यामुळे याला कडबे आळी असे म्हणतात. या वरूनच चालू करण्यात आलेल्या तालमीलाही कडबे आळी तालीम नाव देण्यात आले. तालमीत उत्तम पैलवान घडले आहेत. त्यामुळे ही शहरात सर्वत्र प्रसिध्द झाली होती. या पार्श्वभूमीवर मंडळालाही कडबे आळी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नाव देण्यात आले. 
                               अमित पळसकर 
                                     अध्यक्ष 
................................................................
पत्र्या मारुती मंदिराला पत्रे बसवण्याची केशव वाडेकरांची इच्छा होती.  ब्रिटिश राजवटीत ससूनला कौलारू पत्रे बसवले होते. केशव वाडेकर यांनी त्यातील शिल्लक पत्र्यांच्या मागणीची विनंती केली. ते पत्रे यांनी मारुती मंदिराला लावले. तेव्हापासून पत्र्या मारुती मंदिर असे नाव पडले आहे. मंडळाला या मंदिरावरूनच पत्र्या मारुती मंडळ नाव ठेवण्यात आले. मंडळाला १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. 
                             दिलीप वाडेकर                                      
                            ज्येष्ठ सभासद 
................................................................
स्वातंत्र्य चळवळीत असणारे काकासाहेब हसबनिस यांच्या नावावरून मंडळाला हसबनिस बखळ नाव देण्यात आले. हसबनिस यांच्या बखळीच्या जागेत लोकमान्य टिळक स्वातंत्र्य चळवळीच्या बैठका घेत असे. टिळकांनी गणेशोत्सव चालू केल्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली बखळीतही गणपती बसवण्यात आला. तेव्हापासून हसबनिस बखळ हे नाव देण्यात आले आहे. मंडळाला १२६ वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. 
                                   विरेंद्र जाधव 
                                     कार्याध्यक्ष 
...............................................................
पुण्यात पेशवेकाळात तटबंदीवर मारुती मंदिरे उभारली गेली. शक्ती आणि संरक्षणाचे प्रतिक म्हणून यांची पूजा केली जात असे. त्याच दृष्टीने गणेश पेठेतील काळभैरवनाथ मंदिराची १८५३ साली स्थापना झाली.  त्यावरून मंडळालाही श्री काळभैरवनाथ तरुण मंडळ असे नाव देण्यात आले. 
                                       चेतन शिवले 
............................................................
लोखंडे तालीम मंडळ स्थापन होऊन १२४ वर्षे पूर्ण झाली आहेत. वस्ताद लोखंडे यांनी १५० वर्षांपूर्वी तालीम उभारली. त्यानंतर या तालमीत गणपती बसवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आम्ही सर्व लोखंडे तालीम संघ या नावाने गणपती बसवत आहोत. 
                          चंद्रकांत सोनवणे
                               सभासद

Web Title: History shines through the names of Ganesh Mandals in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.