नीरा येथे चित्ररथातून उलगडला एसटीचा इतिहास
By admin | Published: November 18, 2016 05:56 AM2016-11-18T05:56:53+5:302016-11-18T05:56:53+5:30
महाराष्ट्रात १९४८मध्ये सुरू झालेली एसटी बस आजपर्यंत कोणत्या स्वरूपात बदलत गेली, याची उत्सुकता आपणा सर्वांनाच असते.
सोमेश्वरनगर : महाराष्ट्रात १९४८मध्ये सुरू झालेली एसटी बस आजपर्यंत कोणत्या स्वरूपात बदलत गेली, याची उत्सुकता आपणा सर्वांनाच असते. स्वांतत्र्यानंतरच्या काळात बससेवेत आमूलाग्र बदल झाला. हा बदल चित्ररूपाने नीरा येथील प्रवाशांसमोर चित्ररूपाने उलगडला. चित्ररथ पाहण्यासाठी चिमुकल्यांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन व एसटीप्रेमी यांच्या वतीने एसटीची माहिती, तिचा इतिहास व सध्याचा प्रवास कुठून व कासा सुरू आहे? याबद्दल माहिती प्रवासी व नागरिकांना व्हावी म्हणून जिल्ह्यात चित्ररथ फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. हा चित्ररथ पुढील १५ दिवस पुणे जिल्ह्यात सर्वत्र फिरणार आहे. आज नीरा येथील बस स्थानकामध्ये हा रथ आला. एसटीचा इतिहास सांगणारा हा रथ पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. प्रवाशांबरोबर महात्मा गांधी विद्यालय, किलाचंद कनिष्ठ महाविद्यालय, लिलावात रिखवलाल शहा कन्याशाळा, ज्युबीलंट इंग्लिश स्कूल आदी शाळांतील मुलांनीही या चित्ररथाच्या माध्यमातून एसटीचा इतिहास समजून घेतला. यामध्ये सुरुवातीला सुरू झालेल्या बसपासून ते सध्या आधुनिक स्वरूपातील बसची विविध मॉडेल, त्या काळातील छायाचित्रे, एसटीची जुनी तिकिटे, पहिल्या कामगारांचे ओळखपत्र, जुने दस्तऐवज, ठेवण्यात आले आहेत. एसटीप्रेमी संतोष भिसे हे येणाऱ्यांना एसटीचा इतिहास सांगत होते. त्यामुळे लोकांना हा इतिहास समजला. या वेळी एसटीच्या वतीने बारामती व पुरंदर आगारांचे वाहतूक निरीक्षक इसाक सय्यद व प्रकाश भुजबळ यांनी १९४८मध्ये ही सेवा सुरू झाल्यापासून एसटीने कशा प्रकारे प्रवास केला, याची माहिती दिली.