संदर्भग्रंथ न वापरता लिहिलेला इतिहास ‘भीषण’ : डॉ. उदयसिंह पेशवा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 01:19 PM2019-12-03T13:19:06+5:302019-12-03T13:45:23+5:30
जे काल्पनिक आहे तेच खरे वाटते....
पुणे : कोणताही संदर्भग्रंथ न वापरता लिहिलेला इतिहास ‘भीषण’ असतो. त्यामुळे अनेक घोटाळे होतात. जे काल्पनिक आहे तेच खरे वाटते, अशा परखड शब्दांत पेशव्यांचे १३ वे वंशज डॉ. उदयसिंह पेशवा यांनी खोटा इतिहास पसरविणाऱ्या समाजमाध्यमांतील ‘वाचाळवीरांना’ लक्ष्य केले.
अनुबंध प्रकाशनाच्या वतीने मोडी लिपीचे अभ्यासक आणि इतिहास संशोधक योगेंद्र ऊर्फ राज मेमाणेलिखित ‘पेशवेकालीन जेजुरी’ पुस्तकाचे प्रकाशन पेशव्यांचे १३वे वंशज श्रीमंत डॉ. उदयसिंह पेशवा यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. होळकर घराण्याचे १३वे वंशज राजेभूषणसिंह होळकर, बाळासाहेब पेशवे (जेजुरीकर) आणि प्रकाशक अनिल कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.
पेशवा आणि होळकर यांचा जुना संबंध आहे, असे सांगून पेशवे घराण्याशी संबंधित ज्या काही आख्यायिका सांगितल्या जातात, त्याचा डॉ. उदयसिंह पेशवा यांनी खरपूस समाचारही घेतला. नानासाहेब पेशवा यांनी एप्रिल १७४९मध्ये पर्वती देवस्थानाची निर्मिती केली. तिथे छत्रपती शाहूमहारांच्या स्मृती जपल्या असे सांगितले जाते, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. मात्र, त्या वेळी शाहूमहाराज हे हयात होते. १५ डिसेंबर १७४९ रोजी म्हणजे सहा महिन्यांनंतर ते निर्वतले. त्यामुळे ‘स्मृती जपल्या’ असे म्हणता येणार नाही. देवेश्वराची जी मूर्ती आहे, ती शाहूमहाराजांच्या चेहºयाची बनवली. तेव्हा आपला जो धनी असेल त्याच्या चेहºयाची मूर्ती बनवायचे. एकदा राजपूत घराण्याकडून मला पत्र आले, की सदाशिवरावांची मुलगी आमच्या घराण्यात दिली होती; पण हे शक्यच नव्हते. कारण, सदाशिवराव पेशवे यांना अपत्यच नव्हते. ते पानिपतामध्ये मारले गेले. अनेक मजेदार गोष्टी जपल्या जातात आणि जे काल्पनिक आहे तेच खरे वाटायला लागते.
आज सोशल मीडियावर इतिहासाचे विकृतीकरण केले जात आहे. मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासाची कागदपत्रे भारतभर आहेत. इतिहासाविषयी वाट्टेल त्या पोस्ट टाकल्या जातात. कोणतीही पोस्ट लिहिण्यापूर्वी कृपया संदर्भ विचारले जावेत. कारण, अशा पोस्टमधून जातीय तेढ निर्माण केली जाते, याकडे मेमाणे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अनिल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मानसी आंब्रेकर यांनी सूत्रसंचालन केले.
......
होळकर घराण्याने कुलदैवत जेजुरीची सेवा केली आहे. महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. जी काही प्रमाणात दुर्लक्षित आहेत, त्या स्थळांचा जीर्णोद्धार केला पाहिजे. इतिहास-अभ्यासकांनी अशी स्थळे शोधून काढायला हवीत. तसेच, अप्रकाशित इतिहास समोर आणायला हवा. - राजेभूषणसिंह होळकर
....
होळकर घराण्याचे महत्त्वपूर्ण योगदान
योगेंद्र मेमाणे यांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘या पुस्तकामधील इतिहास मोडी लिपीच्या कागदपत्रांवरून लिहिलेला आहे. चुका घडू द्यायचा नाहीत, असे ठरविले होते. मी पेशवे दफ्तरात जायचो. जेजुरीचे कागद पाहायला सुरुवात केली. यावर एक छान पुस्तक होईल, असे वाटले. इतिहासाच्या नोंदी घेणे, समकालीन संदर्भ तपासणे या गोष्टी कराव्या लागल्या. हे पुस्तकलेखन माझ्यासाठी आव्हान होते. जेजुरीच्या जडणघडणीमध्ये होळकर घराण्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.’’