बायोमेडिकल जाळणाऱ्या गुऱ्हाळांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:08 AM2021-06-18T04:08:53+5:302021-06-18T04:08:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क यवत/ पुणे : दाैंड तालुक्यात खामगाव येथे गुऱ्हाळावर धोकादाय बायोमेडिकल वेस्ट जाळण्यासाठी नेणाऱ्या ट्रॅक्टर, तसेच गुऱ्हाळमालकावर ...

Hit the biomedical burning cattle | बायोमेडिकल जाळणाऱ्या गुऱ्हाळांना दणका

बायोमेडिकल जाळणाऱ्या गुऱ्हाळांना दणका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

यवत/ पुणे : दाैंड तालुक्यात खामगाव येथे गुऱ्हाळावर धोकादाय बायोमेडिकल वेस्ट जाळण्यासाठी नेणाऱ्या ट्रॅक्टर, तसेच गुऱ्हाळमालकावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच पोलिसांनी कारवाई करत रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तिघांसह त्यांना बायोवेस्ट पुरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाैंड तालुक्यात गुऱ्हाळांवर बायोवेस्ट जाळण्यात येत असलेल्या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त दिले होते. याची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली असून, दौंड तालुक्यातील १३ गुऱ्हाळमालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

गुऱ्हाळचालक महंमद अहकाम गुलजार (वय २३, रा. उत्तराखंड), ज्ञानेश्वर एकनाथ सांगळे (वय २६), आक्रम मुशरफ व बायो मेडिकल वेस्ट पुरवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला असून महंमद गुलजार, ज्ञानेश्वर सांगळे याला अटक करण्यात आली आहे. खामगाव (ता.दौंड) येथे गुऱ्हाळावर जाळण्यासाठी दोन टॅक्टर ट्रॉली भरून पीपीई कीट, मास्क व हॉस्पिटलमधील बायो मेडिकल वेस्ट जाळण्यासाठी नेत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी बुधवारी (दि. १६) सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे, वाबळे, पोलीस नाईक बनसोडे, शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, होळकर यांना शोध घेण्यासाठी पाठविले.

पोलीस पथक शोध घेत असताना खामगाव ते नांदूर रोडवरील एका गुऱ्हाळसमोर संशयित ट्रॅक्टर पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी जवळ जाऊन खात्री केली असता ट्रॅक्टर मध्ये हॉस्पिटल मधील मेडिकल वेस्ट आढळून आले. पोलिसांनी दोन आरोपी व ट्रॅक्टरसह बायो मेडिकल वेस्ट ताब्यात घेतल्याची माहिती निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.

दौंड तालुक्यातील गुऱ्हाळावर मोठ्या प्रमाणात अवैधपणे गेल्या काही दिवांपासून बायोवेस्ट जाळण्यात येत आहे. तसेच, पर्यावरण रक्षणाच्या नियमांचेही पालन होत नसल्याने महाष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तालुक्यात तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी दिले आहे. त्यानुसार १३ गुऱ्हाळ चालक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसले. केडगाव येथील विठ्ठल केरू पिसे, प्रेम पिसे, संतोष मारुती पिसे, दीपक सूर्यकांत सोंडकर, किसन केरू जराड तसेच दापाेडी येथील किरन विनायक ताडगे, केडगाव येथील बाळू सबाजी मेमाने, संपत सबाजी मेमाने, दापोडी येथील तुकाराम धोंडीबा तुळे, आशा सुनील मोहिते, गणेश साहेबराव मोहिते यांना, तर भोर तालुक्यातील पुणे-सातारा मार्गावरील केळवडे येथील स्वामी समर्थ गृह उद्योग या गुऱ्हाळमालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

चाैकट

पाणी, वीजजोड तोडणार

महाष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दौंड आणि भोर तालुक्यातील गुऱ्हाळमालकांच्या गुऱ्हाळाचे वीज आणि पाणीजोड तोडण्यात येणार आहे, तशा सूचना तहसीलदार आणि ग्रामपंचायतींना देण्यात आल्या असून, लवकरच कारवाई केली जाणार आहे.

चौकट

‘लोकमत’ने दिले होते वृत्त

केडगाव येथे एका गुऱ्हाळावर बायोवेस्ट जाळण्यासंदर्भात ‘लोकमत’ने सर्वप्रथम वृत्त दिले होते. यासंदर्भात, ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रारी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. याबाबत महाष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही पत्र देण्यात आले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

कोट

दौंड तालुक्यातील गुऱ्हाळासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे सर्व गुऱ्हाळे तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांमार्फत त्या करण्यात येत असून दोषपूर्ण गुऱ्हाळमालकांना नोटिसा दिल्या जात आहे.

-नितीन शिंदे, प्रादेशिक अधिकारी, महाष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे

Web Title: Hit the biomedical burning cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.