सदनिकेचा ताबा वेळेत न दिल्याप्रकरणी बिल्डरला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:02+5:302021-09-05T04:14:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: सदनिकेची पूर्ण रक्कम भरून देखील मुदतीत सदनिकेचा ताबा न दिल्याप्रकरणी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: सदनिकेची पूर्ण रक्कम भरून देखील मुदतीत सदनिकेचा ताबा न दिल्याप्रकरणी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बांधकाम व्यावसायिकाला दणका दिला आहे. तक्रारदाराने भरलेले ५९ लाख ४३ हजार ७०० रुपये मे २०१७ पासून ९ टक्के व्याजाने दोन महिन्यांच्या आत परत करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या कालावधीत रक्कम न दिल्यास १८ टक्के व्याजाने रक्कम देण्याचे आदेश देण्याबरोबरच नुकसानभरपाईपोटी ३ लाख रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी ५० हजार रुपये देण्यात यावे, असे ही आयोगाच्या आदेशात नमूद केले आहे.
याबाबत कर्वेनगर येथील ॲड. बाळकृष्ण निढाळकर यांनी बावधन येथील पृथ्वी शेल्टर्स विरुद्ध राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांनी पृथ्वी शेल्टर्स यांच्या बावधन येथील साई व्हेलोसिटी फेज २ प्रकल्पामध्ये सदनिकेचे बुकिंग केले. कराराप्रमाणे ५९ लाख ४३ हजार ७०० रुपये दिले. या सदनिकेचा ताबा डिसेंबर २०१७ मध्ये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तक्रारदार यांनी सर्व रक्कम भरून देखील त्यांना वेळेत सदनिकेचा ताबा देण्यात आला नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी ॲड. प्रसाद दिवटे यांच्यातर्फे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत तक्रार दाखल केली. यावर ग्राहक आयोगाने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्यांच्या आधारे तसेच युक्तिवादानंतर तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिला. पृथ्वी शेल्टर्स यांनी अनुसूचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला असून, त्यांनी तक्रारदाराला मानसिक त्रास दिल्याने ते नुकसानभरपाईस पात्र आहे, असे आदेशात म्हटले आहे.
--------------------------------