क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागला; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 01:50 PM2024-05-05T13:50:33+5:302024-05-05T13:51:19+5:30
मुलगा कुस्तीपटू असून खेळण्याच्या वयात खेळातूनच त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
लोहगाव : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना लोहगावमधील जगद्गुरू पोर्ट्स अकॅडमी मैदानात गुरुवारी रात्री ९ चे दरम्यान घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे (वय ११ रा. लोहगाव, पुणे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सहावीमध्ये शिकणारा शंभू हा शाळेला सुट्या असल्याने गुरुवारी (२ मे) सायंकाळी आपल्या घरातील इतर मुलांसोबत तो क्रिकेट खेळत होता. शंभूला खेळताना अचानक पुढून येणारा चेंडू गुप्तांगावर लागला. त्यावेळी अचानक तो मैदानात खाली पडला. त्यानंतर तो उठून उभा राहिला खरा मात्र त्याला वेदना असह्य झाल्या आणि तो पुन्हा खाली कोसळला. त्यामुळे इतर मुले गोंधळून गेली. त्या मुलांनी आरडाओरडा केल्याने जवळच्या नागरिकांनी शंभूला खासगी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित करण्यात आले.
शंभूचा मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शंभूच्या अचानक मृत्यूमुळे खांदवे कुटुंबीयांसह लोहगाव व परिसरात शोककळा पसरली आहे. शंभू हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती बंडू खांदवे यांचा पुतण्या होता.
पालक मुलांनी अंतर्गत संरक्षण कवच घालण्याविषयी जागरूक राहण्याची गरज माझ्या घरातील माझ्या चिमुकल्या पुतण्यासोबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्यातून धडा घेत प्रत्येक पालकांनी मुलांना खेळायला सोडताना संरक्षक साधनांचा वापर करण्यासाठी सूचना देणे अत्यंत आवश्यक आहे. शौर्य हा कुस्तीपटू होता. खेळण्याच्या वयात खेळातूनच त्याचा मृत्यू व्हावा हे दु:ख प्रचंड मोठे आहे. त्यामुळे पालकांनी सध्याच्या उन्हामध्ये मुलांकडे खेळायला सोडताना अधिक लक्ष द्यावे. - बंडू खांदवे (शंभूचे काका)