हिवरे गाव मतदानात आघाडीवर
By admin | Published: October 7, 2014 06:22 AM2014-10-07T06:22:57+5:302014-10-07T06:22:57+5:30
पाण्याच्या उपोषणाचे निमित्त करून पालखी तळावर भाटांची गर्दी जमवली. या भाटांनी तसेच आमदारांनी वडीलधाऱ्या अजितदादांविरोधात बोलण्याचे तोंडसुख घेतले
नारायणपूर / खळद : पाण्याच्या उपोषणाचे निमित्त करून पालखी तळावर भाटांची गर्दी जमवली. या भाटांनी तसेच आमदारांनी वडीलधाऱ्या अजितदादांविरोधात बोलण्याचे तोंडसुख घेतले. पण उपोषण हा फक्त देखावाच होता. त्यांना राष्ट्रवादीच्या श्रद्धास्थानावर हल्ला करायचा होता. अशा या बोलघेवड्या आमदारांना आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. घड्याळाच्या चित्रापुढील बटण दाबून विकासाचा पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीला हिवरे गाव मतदानात आघाडीवर असेल, असे आवाहन राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक टेकवडे यांनी केले.
हिवरे (ता. पुरंदर) येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पक्षाचे उमेदवार अशोक टेकवडे यांच्या कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभेत अशोक टेकवडे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे होते.
या वेळी सरपंच रंजना कुदळे, उपसरपंच रघुनाथ नेटके, आशा बिरामणे, मुक्ताबाई गायकवाड, मंगला गायकवाड, अरुण कुदळे, शिवाजी गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, तानाजी गायकवाड, श्रीरंग गायकवाड, अशोक गायकवाड, नीलेश गायकवाड, गणेश कुदळे, पप्पू कुदळे, नंदू गायकवाड आदी उपस्थित होते.
बापदेवघाट रुंदीकरण, पुरंदर उपसा, जनाई शिरसाई, सासवड पाणीपुरवठा, जेजुरी औद्योगिक वसाहत ही कामे राष्ट्रवादीच्या माध्यमातून झाली. पण आमदार साहेब आपण काय केले, याचा रोकडा सवाल जनतेने त्यांना विचारावा. तसेच आपण अशोक टेकवडे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.
हिवरे गावात रोटरी, वनराई व लोकसहभागातून बंधारे बांधले आहेत. त्यातील गाळ काढल्यामुळे हे बंधारे पाण्याने भरल्यामुळे आज गावाचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र आज सभेत मी तालुक्याला पाणी आणणार म्हणून काही लोक चुकीच्या वल्गना करीत आहेत. तेव्हा यापुढे त्यांना रोखले पाहिजे, असे माजी सरपंच एम.के. गायकवाड यांनी सांगितले. गुलाब गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.