HMPV Virus Cases : नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष;पुणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क

By राजू हिंगे | Updated: January 6, 2025 20:33 IST2025-01-06T20:32:57+5:302025-01-06T20:33:37+5:30

चीनमध्ये एचएमपीव्ही या साथरोग आला आहे. अनेक राज्यांमध्ये हा विषाणू पसरलेला आहे.

HMPV Virus Cases 50-bed isolation ward at Naidu Infectious Diseases Hospital | HMPV Virus Cases : नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष;पुणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क

HMPV Virus Cases : नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष;पुणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क

पुणे : देशात एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले असल्याने पुणे महापालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क करत उपाययोजना सुरू केल्या आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केला आहे.

चीनमध्ये एचएमपीव्ही या साथरोग आला आहे. अनेक राज्यांमध्ये हा विषाणू पसरलेला आहे. या विषाणूची लागण बंगळुरूमधील एका आठ महिन्यांच्या मुलीलाही झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यासंदर्भात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून पुणे महापालिकेलाही खबरदारीसाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. बंगळुरूमध्ये एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेला सतर्क राहण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

पुणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा तयार आहे. महापालिकेने अजून कोणाचेही थुंकीचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवलेले नाहीत. हिवाळ्यामध्ये ताप, खोकला येण्यासह अतिअशक्तपणा येणे, उलट्या होणे, ताप वाढणे, श्वसनास त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल व्हावे.

विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू केलेली नाही

देशात एचएमपीव्हीचा रुग्ण आढळला आहे; पण पुणे महापालिकेने लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू केलेली नाही. त्यामुळे या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. याबाबतचा निर्णय पुढच्या बैठकीत घेतला जाईल, पुण्यातील लोहगाव विमानतळावर देशभरातील विविध शहरांतून विमाने येतात. रोज हजारो प्रवाशांची तेथे वर्दळ असते. बंगळुरू येथूनही पुण्यामध्ये विमानांची ये-जा आहे; पण अजूनही महापालिकेने विमानतळावर प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरू केलेली नाही. त्यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे.

लोहगाव विमानतळावर अद्याप प्रवाशांची तपासणी सुरू केलेली नाही. पुढच्या बैठकीत याबाबतचा निर्णय केला जाईल. या विषाणूंची चर्चा होत असली तरी त्यास घाबरू नये. - डॉ. नीना बोराडे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका 

Web Title: HMPV Virus Cases 50-bed isolation ward at Naidu Infectious Diseases Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.