संघाचे मार्गदर्शक व प्रत्येक खेळाडूने दिलेल्या प्रोत्साहनामुळे हॉकीत चांगली कामगिरी : सविता पुनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 07:14 PM2017-11-15T19:14:13+5:302017-11-15T19:19:46+5:30

सर्वात जास्त दबाव असतो तो गोलरक्षकाला आणि याच मानसिक दबावातून बाहेर काढण्याचे काम आशियाई स्पर्धेतील अंतिम फेरीत संघाचे मार्गदर्शक हरिंदर सिंग यांनी केले, असे वक्तव्य हॉकीपटू सविता पुनिया हिने केले.

Hockey team good performance due to team coach and encouragement given by each player: Savita Punia | संघाचे मार्गदर्शक व प्रत्येक खेळाडूने दिलेल्या प्रोत्साहनामुळे हॉकीत चांगली कामगिरी : सविता पुनिया

संघाचे मार्गदर्शक व प्रत्येक खेळाडूने दिलेल्या प्रोत्साहनामुळे हॉकीत चांगली कामगिरी : सविता पुनिया

googlenewsNext
ठळक मुद्दे मानसिक दबावातून बाहेर काढण्याचे काम मार्गदर्शक हरिंदर सिंग यांनी केले : सविता पुनिया२५ नोव्हेंबरपासून बंगळूरू किंवा लखनौ येथे होणार प्रशिक्षण शिबिरास सुरूवात

शिवाजी गोरे
पुणे : ज्याप्रमाणे घरी असताना आमच्या चेहर्‍याचे हावभाव पाहून आई, वडील, बहिण, भाऊ आम्हाला विचारतात काही दडपण आहे का, काही अडचण आहे का? याचप्रमाणे जेव्हा आम्ही स्पर्धांच्या निमित्ताने बाहेर परदेशात असतो त्यावेळी आमची आपुलकीने काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे संघाचा मार्गदर्शक असतो. कोण म्हणतं शुटआऊटमध्ये गोलरक्षकाला दबाव नसतो. सर्वात जास्त दबाव असतो तो गोलरक्षकाला आणि याच मानसिक दबावातून बाहेर काढण्याचे काम आशियाई स्पर्धेतील अंतिम फेरीत संघाचे मार्गदर्शक हरिंदर सिंग यांनी केले आणि त्यामुळे मी चीनविरूद्ध शूटआउटमध्ये एक गोल अडविण्यात यशस्वी झाले आणि आम्ही ५-४ गोलने १३ वर्षानंतर चषक जिंकलो, असे भारतीय संघाची गोलरक्षक सविता पुनियाने ‘लोकमत’ला सांगितले.
नुकत्याच काकामिगहरा (जपान) येथे झालेल्या आशियाई महिलांच्या हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत शुटआऊटमध्ये चीनला पराभूत करून विजेतेपद जिंकलेल्या भारतीय संघाची गोलरक्षक सविता पुनिया फाईव्ह अ साईड हॉकी स्पर्धेसाठी पुण्यात आली असता तिने वरील वक्तव्य केले. 
सविता म्हणाली, आशियाई चषक विजेतेपदाचे श्रेय संपूर्ण संघाला जाते. संघाचे मार्गदर्शक आणि संघातील प्रत्येक खेळाडूने दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी चांगली कामगिरी करू शकले. जेंव्हा त्या स्पर्धेत मला उत्कृष्ट गोलरक्षकाला पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळी माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शुटआऊटमध्ये माझ्या मनावर खरचं खूप दडपण होतं. पण जेव्हा संघाचे मार्गदर्शक हरिंदर सिंग यांनी सहकारात्मक मार्गदर्शन करून की तू उत्कृष्ट गोलरक्षण करणार आहेस फक्त चेंडूकडे लक्ष केंद्रीत कर.. कोणतंही दडपण मनावर घेऊ नको, त्यांच्या या मौल्यवान सल्ल्यानेच आत्मविश्वास वाढला आणि मी सर्वोत्कृष्ट गोलरक्षण करू शकले. २00५ पासून हॉकीचं आपले सर्वस्व या भावनेतून मी खेळण्यास सुरूवात केली. सुरूवातीला हरिणायामधील जोधकण (जि. सिरसा,. हरियाणा) गावातील अनेकांनी माझ्या खेळण्यावर माझी ना पसंती व्यक्त केली. माझी खेळातील आवड  आणि जिद्द पाहून घरच्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला आणि मी माझी हॉकीची कारकीर्द सुरू केली. हरिणायाकडून खेळताना माझा खेळ बहरत गेला आणि भारतीय संघात २००८ मध्ये मला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली. माझ्या सरावासाठी मी भारतीय संघाचा गोलरक्षक श्रीजेश याच्या व्हिडिओ क्लीप पाहत होती कारण मी उत्कृष्ट गोररक्षक होण्याचा विडा उचलला होता. भारतीय संघात आल्यानंतर माझा जेव्हा सराव सुरू झाला तेव्हा मला माझ्या चुका सुधारण्याची संधी मिळाली. 
आशियाई स्पर्धेदरम्यान जेव्हा हरिंदर सिंग यांनी आम्हाला मार्गदर्शक करण्यास सुरूवात केली, त्यावेळीस त्यांनी आमचा मुख्य सराव झाल्यानंतर शुटआऊटमध्ये कसे गोलरक्षण करायचे याचे मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली. त्यावेळी ते मला नेहमी सांगायचे पॅनेल्टी शुटआऊटमध्ये आपले मन नेहमी शांत ठेवायचे असतं. तुझं लक्ष हे चेंडूकडेच हवे. या वेळी तुझी तंदुरूस्ती, चपळता आणि आत्मविश्वास याचा कस लागणार आहे. त्यामुळे तुला खूप शांत राहून लक्षपूर्वक गोरलक्षण करायचे आहे. त्यांचे हे सहकारात्मक मार्गदर्शन मला नेहमीच प्रोत्साहीत करते. त्यामुळेच माझा आत्मविश्वास सातत्याने वाढत असतो. 
याच दरम्यान एका विचारलेल्या प्रश्नावर सविताने सांगितले की, दि. २५ नोव्हेंबरपासून बंगळूरू किंवा लखनौ येथे आमचे प्रशिक्षण शिबिर सुरू होईल. पुढची तयारी आमची राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसाठी असेल. 

 

हरिंदर सिंग हे एक सहकारात्मक आणि उत्कृष्ठ मार्गदर्शक आहेत. संघातील खेळाडूंना ते नेहमीच प्रोत्साहन देतात आणि त्यांच्या अडीअडचणींकडे लक्ष देऊन त्यातून मार्ग काढण्याचा सल्ला देतात. त्यांचं नेहमी म्हणणं असते आपल्याला पदक जिंकायचं आणि त्यादृष्टीने आपल्या खेळातील उणीवा दूर करून विरूद्ध संघावर मात करायची आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेनंतर टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेकडे आमचे विशेष लक्ष असेल. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तर आम्हाला सुवर्णपदक जिंकण्याच्यादृष्टीने तयारी करावी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई चषक स्पर्धेत आमच्या कडून झालेल्या चुका आम्ही आता या सराव शिबिरामध्ये दूर करण्याचा प्रयत्न करून पुढील स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज राहू.

- सविता पुनिया, हॉकीपटू

Web Title: Hockey team good performance due to team coach and encouragement given by each player: Savita Punia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.