‘ध्वज उंच धरू या मराठी विकासाचा!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:11 AM2021-09-11T04:11:29+5:302021-09-11T04:11:29+5:30
पालकांचा ओढा व देशातील प्रादेशिक भाषांचे गुंतागुंतीचे राजकारण पाहता इंग्रजीचे प्राधान्य या देशात कायम राहणार आहे, त्यामुळे इंग्रजी, हिंदी ...
पालकांचा ओढा व देशातील प्रादेशिक भाषांचे गुंतागुंतीचे राजकारण पाहता इंग्रजीचे प्राधान्य या देशात कायम राहणार आहे, त्यामुळे इंग्रजी, हिंदी आणि अन्य भाषांच्या माध्यमांच्या शाळांमध्ये विध्यार्थ्यांना कायदा करून सक्तीने मराठी शिकवणे, मराठी भाषा ही सर्वार्थाने ज्ञान, विज्ञान व रोजगाराची भाषा होण्यासाठी संशोधन व लक्ष केंद्रित असे उच्च दर्जाचे उपक्रमशील मराठी विद्यापीठ निर्माण करणे आणि मराठी लोकव्यवहाराची भाषा होण्यासाठी अर्धन्यायिक दर्जा असणारे प्रभावी मराठी भाषा प्राधिकरण कायद्याद्वारे प्रस्थापित करून स्वायत्त आयोग नेमणे या त्रिसूत्रीनेच मराठी भाषेला तिचे उचित स्थान प्राप्त होईल हा विचारपूर्वक आराखडा ‘मराठीच्या भल्यासाठी’ मंचाने तयार केला. त्याची आवश्यकता शासनाला पटवून देणे, त्यासाठी संवाद व पाठपुरावा करणे व प्रसंगी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करण्याची तयारी ठेवणे हा कार्यक्रम ठरवला. मागील दीड वर्षात मधू मंगेश कर्णिक व प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह मी अशा तिघांनी कार्यकारणीच्या सदस्यांच्या सहकार्याने शासनाशी सातत्यपूर्ण संवाद केला. महाविकास आघाडी सरकारने संवेदनशीलता दाखविल्यामुळे सक्तीने मराठी शिकवण्याचा कायदा झाला. मराठी विद्यापीठ कायदा तत्त्वतः मान्य झाला. प्रत्येक जिल्ह्यात मराठी अधिकारी नेमण्याचा निर्णय झाला.
महाराष्ट्राचा सर्व लोकव्यवहार मराठीत होण्यासाठी हा कायदा कसा महत्त्वाचा आहे हे पटवून देणे व डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात कायदा सादर होईल यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. शालेय विद्यार्थ्यात वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी शासन निर्णय व्हावा. इ- मराठी, मराठी विद्यापीठाचे स्वरूप ठरविणे व मराठीतून विज्ञान व तंत्रज्ञानाचे महाविद्यालयीन व विश्वविद्यालयीन शिक्षण इंग्रजीच्या जोडीने उपलब्ध करून देण्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मिती करणे. त्यासाठी अनुवाद केंद्र स्थापन करणे यासाठी विवेक सावंत, नागनाथ कोतापल्ले, महेंद्र कदम व रणधीर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आले. ‘मराठीच्या भल्यासाठी’ ने आता मराठी विकासाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मराठी भाषा प्राधिकरण कायदा, मराठी विद्यापीठ पुढील वर्षी सुरू करणे व शालेय विद्यार्थ्यात वाचन संस्कृती निर्माण करणे हे तीन विषय आम्ही पुढील कामासाठी निश्चित केले आहेत. प्रश्न आहे तो आपली मराठी भाषिक ओळख अधिक लख्ख करण्याचा व आपली अस्मिता अधिक प्रखर करण्याचा. कारण ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी!’