Pune: ‘त्या’ तरुणीच्या खुनाआधीच खोदला होता खड्डा, पैशांसाठी थंड डोक्याने कट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 12:59 PM2024-04-09T12:59:23+5:302024-04-09T13:09:05+5:30

तरुणीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी एक दिवस आधीच (२९ मार्च) शंभर किलोमीटर जाऊन खड्डा खणून ठेवला होता, असेदेखील आरोपींनी पोलिसांना सांगितले....

hole was dug before the murder of 'that' young woman, a cold-headed conspiracy for money | Pune: ‘त्या’ तरुणीच्या खुनाआधीच खोदला होता खड्डा, पैशांसाठी थंड डोक्याने कट

Pune: ‘त्या’ तरुणीच्या खुनाआधीच खोदला होता खड्डा, पैशांसाठी थंड डोक्याने कट

पुणे : खंडणीसाठी तरुणीचे अपहरण करायचे, मात्र तिला जिवंत सोडायचे नाही, हे ठरवूनच तरुणीला जेवण करण्यासाठी जाऊ असे सांगून नेले. त्यानंतर काही तासांतच तिचा तोंड दाबून खून करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. तसेच, तरुणीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी एक दिवस आधीच (२९ मार्च) शंभर किलोमीटर जाऊन खड्डा खणून ठेवला होता, असेदेखील आरोपींनी पोलिसांना सांगितले.

तरुणीचा खून केल्यानंतर मृतदेह ओळखू नये, यासाठी तिघांनी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला आणि त्यानंतर खड्ड्यात पुरला. त्यासाठी एका दुकानातून टिकाव, फावडेदेखील खरेदी केले होते. दरम्यान, भाग्यश्रीचा खून आरोपींनी ठरवून शांत डोक्यानेच केल्याचेदेखील यावरून दिसून येते. भाग्यश्री सूर्यकांत सुडे (२२, रा. लिव्हिंग प्रिसो हाउस, साकोरेगनर, विमानगर, मूळ. रा. हरंगुळ बुद्रुक, ता. जि. लातूर) असे तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी, विमानतळ पोलिसांनी शिवम माधव फुलवळे (२१, रा. ऑक्सी हेवन सोसायटी, वाघोली, मूळ. नांदेड), सुरेश शिवाजी इंदोरे (२३, रा. मुंबई, मु. सकनूर, नांदेड) आणि सागर रमेश जाधव (२३, रा. कासलेवाडी, ता. शिरोळा, अनंतपाळ, जि. लातूर) यांना अटक केली आहे. यातील शिवम फुलवळे हा या घटनेतील मुख्य सूत्रधार असून, तो भाग्यश्रीसोबत एकाच महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. दोघेही चौथ्या वर्षात वेगवेगळ्या विभागात शिक्षण घेत होते. शिवमनेच सुरेश आणि सागर या आपल्या दोन मित्रांना सोबत घेऊन भाग्यश्रीचा काटा काढला. क्रौर्याची परिसीमा म्हणजे तिचा खून केल्यानंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून पुरला होता. त्यानंतर तिघे नांदेडला पळून गेले होते.

सेल्फ ड्राइव्ह कार, अपहरण, मृतदेहाची विल्हेवाट

भाग्यश्री सुडे मूळची लातूर जिल्ह्यातील हरंगुळ बुद्रुक गावची. वडील गावचे माजी सरपंच. घरची परिस्थिती सधन. अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी ती पुण्यात आली होती. वाघोलीतील एका नामांकित महाविद्यालयामध्ये चौथ्या वर्षात ती शिक्षण घेत होती, तर आरोपी शिवमचे वडील शिक्षक आहेत. तोदेखील त्याच महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दोघांची काही महिन्यांपूर्वीच ओळख झाली होती. ३० मार्च रोजी शिवमने भाग्यश्रीला बाहेर जेवणासाठी जायचे आहे म्हणून फोन केला. त्यावेळी भाग्यश्री फिनिक्स मॉलमध्ये होती. दरम्यान, प्री प्लॅननुसार आरोपींनी झूम कारवरून एक कार भाड्याने घेतली. तसेच, भाग्यश्रीला रात्री जेवायला म्हणून शिवमने बोलवले. ती आल्यानंतर तिचे कारमधून अपहरण केले. मोबाइल काढून घेऊन त्याचा पिनही घेतला. तसेच तिचे पाय व तोंड चिकटपट्टीने बांधले. तिचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी गाडीमध्येच तिचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर आरोपींनी कार पुणे-नगर रस्त्याने अहमदनगर जिल्ह्यातील कामरगाव येथे नेली. आधीच खणलेल्या खड्ड्यात तिचा मृतदेह टाकून तो पेट्रोल टाकून जाळला, त्यानंतर तो पुरला. त्यासाठी गाडीत आधीपासूनच पेट्रोल घेतले होते. २९ मार्च रोजी कामरगावच्या परिसरात आरोपींनी खड्डा खणून ठेवला होता.

खून करून मागितली खंडणी

भाग्यश्रीचे ज्या दिवशी अपहरण करण्यात आले, त्याच दिवशी काही तासांनी तिचा खून करण्यात आला. त्यानंतर दोन दिवसांनी तिच्या मोबाइलवरून मेसेज करून ९ लाखांच्या खंडणीची मागणी केली. भाग्यश्रीचा मोबाइल आरोपींकडे होता. आरोपी तिच्या आईचा मेसेज आल्यानंतर तिच्याशी बोलत होते. दोन दिवसांनी म्हणजे, २ एप्रिल रोजी आरोपींनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून खंडणी मागितली. तसेच, पैसे न दिल्यास तिचे तुकडे करू अशीही धमकी दिली. त्यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेत याबाबत तक्रार दिली.

आईला वाढदिवसाला जात असल्याचे सांगितले

भाग्यश्रीने ३० मार्च रोजी आईला फोन करून मी, मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी विमाननगरमधील मॉलमध्ये जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ३१ मार्च रोजी तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला, तेव्हा मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले.

असा झाला खुनाचा उलगडा

गुन्ह्यापासून वाचण्यासाठी शिवमने पूर्ण खबरदारी घेतली होती. त्याने आपल्या दोन मित्रांना पैशांचे प्रलोभन दाखवले. तसेच, आपण केवळ भाग्यश्रीला घाबरवत आहोत असे सांगितले. एकदा का पैसे मिळाले, की संपले असे तो सांगत होता. मात्र, शिवमच्या डोक्यात वेगळाच विचार सुरू होता. झूम कार भाड्याने घेण्यापासून ते भाग्यश्रीचे अपहरण, खून, मृतदेहाची विल्हेवाट ते खंडणीची मागणी याबाबत त्याने खबरदारी घेतली होती. खंडणीचे पैसे शिवम भाग्यश्रीच्या बँक खात्यावर मागत होता. त्यासाठी त्याने भाग्यश्रीच्या फोन पे चा ॲक्सेस स्वत:कडे घेतला. तो घेताना त्याने मोबाइल क्रमांक मात्र स्वत:चा दिला होता. ही प्रक्रिया करत असताना, जनरेट झालेला पिन त्याच्या मोबाइलवर आला. त्याचवेळी पोलिसांना शिवम याचा संपर्क क्रमांक मिळाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. याच वेळी दुसऱ्या पथकाला सुरेश आणि सागर या दोघांची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्यांचा पॅटर्न राबवला. त्यानंतर आरोपींनी भाग्यश्रीचा खून केल्याचे सांगितले. रविवारी (ता. ८) रात्री उशिरा भाग्यश्रीचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढून, ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. ९ लाखांच्या खंडणीसाठी भाग्यश्रीचे अपहरण केल्याचे आरोपी सांगत आहेत. मात्र त्यांनी भाग्यश्रीचा खून करून खंडणीची मागणी केली आहे. त्यामुळे याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, सर्जेराव कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन, उपनिरीक्षक चेतन भोसले, अंमलदार सचिन जाधव, गणेश इथापे, राकेश चांदेकर, शैलेश नाईक, रूपेश तोडेकर, अस्मल अत्तार, किरण खुडे, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, रूपेश पिसाळ, दादासाहेब बर्डे, ज्ञानेश्वर आवारी आणि अविनाश कोंडे यांच्या पथकाने केली.

Web Title: hole was dug before the murder of 'that' young woman, a cold-headed conspiracy for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.