कोल्हापुरात धमकीच्या पत्राची आंदोलकांकडून होळी

By admin | Published: June 30, 2017 05:21 PM2017-06-30T17:21:42+5:302017-06-30T17:21:42+5:30

पुण्यातील ब्राम्हण महासंघाचा निषेध

Holi from the protesters of the threat letter in Kolhapur | कोल्हापुरात धमकीच्या पत्राची आंदोलकांकडून होळी

कोल्हापुरात धमकीच्या पत्राची आंदोलकांकडून होळी

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ३0 : पुजारी हटाओ मंदिर बचाओ, अंबा माता की जय च्या घोषणा देत श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ आंदोलनातील कार्यकर्त्यांना पाठवण्यात आलेल्या धमकीच्या पत्राची शुक्रवारी छत्रपती शिवाजी चौकात होळी करण्यात आली. तसेच या प्रकरणाला जातीयवादाचा रंग देणाऱ्या पूण्यातील अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला.

अंबाबाईला घागरा चोली नेसवल्यापासून गेल्या वीस दिवसांपासून कोल्हापुरात अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ आंदोलन सुरु झाले आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीत श्रीपूजक अजित ठाणेकर यांना मारहाण झाल्यानंतर प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांना मंदिर प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

या सगळ््या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आंदोलनातील कार्यकर्ते दिलीप पाटील यांना दिलीप देसाई, सचिन तोडकर यांच्यासह तुम्हीही अंबाबाई मंदिर आंदोलनातून बाजूला व्हा अन्यथा पानसरेप्रमाणे बंदोबस्त करू अशा आशयाचे पत्र पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे पुण्यातील अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने सोशल मिडियावर व्हिडिओ पाठवून या प्रकरणाला ब्राम्हणविरोधी जातीयवादाचा रंग दिला आहे. या दोन्ही घटनांचा यावेळी निषेध करण्यात आला व धमकीच्या पत्राची होळी करण्यात आली.

यावेळी दिलीप देसाई म्हणाले, समन्वय बैठकीत पालकमंत्र्यांनी पुजारी हटाओ संदर्भात समिती स्थापन करा असे आदेश दिले आणि आठवड्याभरातच घुंमजाव केला. त्यामुळे भाजप सरकारकडून या प्रकरणात न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. न्यायव्यवस्था ही सर्वश्रेष्ठ असते. आंदोलनातून सर्वाचे लक्ष विचलित करुन करुन मुळ मुद्दा बाजूला सारण्यासाठी धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे, त्याकडे आम्ही दुर्लक्षच केले आहे. पुजारी हटाओचा निर्णय होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही.

डॉ. सुभाष देसाई म्हणाले, वर्षभरापूर्वी मला या पूजाऱ्याच्यावतीने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तेंव्हापासून पोलीसांनी एकाही पुजाऱ्याला अटक केलेली नाही. आता पून्हा तीन आंदोलकांना धमकीचे पत्र आले आहे. यावरुन पुजाऱ्यांना प्रतिगामी शक्तीचे पाठबळ असल्याचे सिद्ध होते. वास्तविक गुन्हे दाखल असलेला पूजारी अजित ठाणेकर याला तातडीने अटक करुन त्याची संपत्ती जप्त केली पाहीजे, पूजाऱ्यांवर आयकर खात्याने छापे टाकले पाहीजे.

वसंतराव मुळीक म्हणाले, अवघे कोल्हापूर आता पुजाऱ्यांच्या मनमानी विरोधात बोलू लागले आहे. मुळ मागणीला बगल देण्यासाठी त्याला जातीचा लढा दाखवला जात आहे. आम्ही सुरवातीपासूनच सांगत आलो आहोत हा लढा जाती विरोधात नाही तर पूजाऱ्यांच्या विरोधात आहे.

यावेळी आर.के. पोवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, दिलीप पाटील, किशोर घाटगे, संजय पवार, जिजाऊ बिग्रेडच्या जयश्री चव्हाण, अ‍ॅड. चारुशिला चव्हाण, माजी नगरसेवक आदिल फरास, प्रकाश पाटील सरुडकर यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत.


लाला जगतापांना भोवळ


या आंदोलनासाठी उपस्थित असलेले लाला जगताप यांना अचानक चक्कर येवून ते खाली पडले. आंदोलकांनी त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले.

 

Web Title: Holi from the protesters of the threat letter in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.