Pune: सुटीच्या काळातील विशेष गाड्यांनी रेल्वेला बनवले ‘मालामाल’; २ महिन्यांत २२ काेटींचा महसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 01:53 PM2024-06-15T13:53:06+5:302024-06-15T14:08:50+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विशेष रेल्वे गाडीतून उत्पन्नात तीनपट वाढ झाली आहे.....
पुणे : उन्हाळी सुट्टीच्या काळात एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत रेल्वेला प्रवाशांची गर्दी असते. यामुळे या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे विभागातून १३२ जादा विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या दोन महिन्यांत या १३२ गाड्यांच्या २६४ फेऱ्या पूर्ण झाल्या असून, यातून पुणे विभागाला २१ कोटी ८७ लाख इतके उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी ७ कोटी ७९ लाख इतके उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र १४ कोटींचे जादा उत्पन्न मिळाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विशेष रेल्वे गाडीतून उत्पन्नात तीनपट वाढ झाली आहे.
उन्हाळी सुट्टीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. यामुळे दरवर्षी या काळात गर्दी होत असते. त्यामुळे मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून महत्त्वाच्या ठिकाणी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. तसेच यावर्षी लोकसभा निवडणुका असल्यामुळे मतदानासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त होती. त्यामुळे पुणे स्थानकावर पाय ''ठेवायला जागा नव्हती. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी गेल्यावर्षीपेक्षा यंदा ७५ जादा रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. तसेच मतदानासाठी स्थलांतरित कामगार गावी जाण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे या काळात रेल्वेवर ताण पडत होता. तरीही प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. त्याचा फायदा पुणे विभागाला महसुलाच्या माध्यमातून झाला आहे.
दोन महिन्यांत २६४ फेऱ्या
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून एप्रिल-मे या दोन महिन्यांच्या गर्दीच्या हंगामात विशेष गाड्यांच्या २६४ फेऱ्या झाल्या आहेत. तरीही प्रवाशांची गर्दी कमी होताना दिसत नव्हती. काहीवेळा तिकीट विक्री बंद करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली होती. तसेच काही प्रवाशांना तिकीट न मिळाल्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढली होती; परंतु रेल्वे प्रशासनाच्या नियोजनामुळे जादा गाड्यांमुळे महसुलात वाढ झाली आहे.
यंदा १४ कोटी जादा उत्पन्न :
पुणे विभागातून गेल्या वर्षी ५७ विशेष जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यातून रेल्वेला ७ कोटी ७९ लाख इतके उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र प्रवाशांची गर्दी लक्षात घेता १३२ जादा गाड्या सोडल्या होत्या. यातून पुणे विभागाला २१ कोटी ८७ लाख इतका महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने १४ कोटी जादा महसूल मिळाला आहे. यातून उत्पन्नात तिप्पट वाढ झाल्याचे दिसत आहे.
उन्हाळी सुटीच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी यंदा रेल्वेने जादा गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे उन्हाळी सुटी आणि निवडणूक असल्याने मतदानाला जाण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेला गर्दी केली होती. यासाठी पुणे विभागातून यंदा १३२ जादा विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. यातून रेल्वेला जवळपास २२ कोटींचा महसूल मिळाला. प्रवाशांच्या सोयीसाठी यापुढे काही मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक