सुटी घरी बसण्यासाठी दिली, बँकेतील कामे करण्यासाठी नव्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 10:00 PM2020-03-20T22:00:00+5:302020-03-20T22:00:01+5:30
शहरातील विविध बँकांमध्ये काही दिवसांपासून नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे..
पुणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक खासगी क्षेत्रातील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ सांगितले आहे. याशिवाय, काही आयटी कंपन्या, खासगी विमा कंपन्यांमधील बहुतांश घरी बसून काम करीत आहेत. वास्तविक, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना राबविण्यात येत असली, तरीदेखील नागरिक सुटीच्या निमित्ताने बँकांमध्ये गर्दी करत आहेत.
शहरातील विविध बँकांमध्ये काही दिवसांपासून नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे. सध्या अत्यावश्यक सेवा सोडून सर्व सेवा बंद ठेवल्या आहेत. यापुढे बँक सेवादेखील बंद होईल, या भीतीने नागरिक बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. तर, दुसरीकडे बँकेतील अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या या गर्दीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसात बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहवयास मिळाली. नागरिकांनी एवढ्या मोठ्या संख्येने बँकेत येण्याऐवजी ऑनलाईनद्वारे बँकिंग करावे, असे बँक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे ‘बँकेत जास्त वेळ थांबू नका’ म्हटल्यावर नागरिकांना बँक प्रशासन अरेरावी करत असल्याचे वाटते, अशी प्रतिक्रिया खासगी बँकेतील व्यक्तीने दिली.
आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया)ने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून त्यात नागरिकांनी बँकेत गर्दी करण्यापेक्षा आपली कामे ऑनलाईनच्या माध्यमातून करावीत, असे सांगितले आहे. असे असतानादेखील नागरिकांची बँकेतील उपस्थिती चिंतेचा विषय ठरत आहे. सक्ती नव्हे, तर स्वयंशिस्तीने सूचना पाळण्याची गरज असल्याचे आवाहन बँक प्रशासन सातत्याने करत आहे. शासनाकडून अद्याप बँकिंग क्षेत्राला ‘वर्क फ्रॉम होम’च्या कुठलेही आदेश अथवा सूचना दिलेल्या नाहीत. प्रत्येक बँकेचे सॉफ्टवेअर वेगवेगळ्या प्रकारचे असल्याने घरून बँकिंगचे काम अवघड असल्याचेही बँकेतील अधिकाऱ्याने सांगितले.
*चौकट
मुळात ज्या कारणाकरिता लोकांना सुटी अथवा ‘वर्क फ्रॉम होम’ सांगितले आहे, त्याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा. आपल्या बेशिस्तपणाचा फटका सर्वांना बसू शकतो, याचा विचार त्यांनी करावा. आता सर्वांकडे आॅनलाईन बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, गुगल पे यासारख्या सुविधा उपलब्ध असतानादेखील विनाकारण त्यांनी बँकेत येण्याचा अट्टहास करू नये. सर्वांनी सहकार्य केल्यास कोरोनाच्या संकटातून बाहेर पडता येईल; अन्यथा त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतील, याचा विचार नागरिकांनी जरूर करावा.
- मंगला राव (बँकर)
०००