निवडणुकीसाठी खासगी शाळांना सुटी
By admin | Published: February 18, 2017 03:22 AM2017-02-18T03:22:08+5:302017-02-18T03:22:08+5:30
अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांमुळे उमेदवारांची प्रचार मोहीम जोरदार सुरू आहे, तर तेवढ्याच गतीने निवडणूक
पिंपरी : अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांमुळे उमेदवारांची प्रचार मोहीम जोरदार सुरू आहे, तर तेवढ्याच गतीने निवडणूक आयोगाचीही तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड परिसरातील खासगी शाळांना नियमित सुट्यांखेरीज दोन दिवस अधिक सुटी (सोमवार व मंगळवार) देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सगळीकडे निवडणुकीच्या प्रचार व पूर्वतयारीचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांवर आलेल्या निवडणुकांसाठी उमेदवार अहोरात्र प्रयत्न करताना दिसत आहेत. एकीकडे उमेदवारांकडून प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाची तयारीही युद्धपातळीवर सुरू आहे. आयोगातर्फे मतदानासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील काही खासगी शाळाही नियोजित करण्यात आल्या आहेत. यातील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांना आठवड्यातील शनिवार व रविवार असे दोन दिवस सुटी असते. या दोन सुट्या, निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठीचा एक दिवस व प्रत्यक्षातील मतदानाचा दिवस आदी गोष्टींचा विचार करून चार दिवस सुट्या देल्या आहेत.
आयोगातर्फे निवडण्यात आलेले शिक्षक कामात व्यस्त आहेत. शिक्षकांअभावी अतिरिक्त ताण पडणाऱ्या शिक्षकांना सलग
सुट्यांमुळे मात्र दिलासा मिळणार आहे. तर विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण दिसत आहे.(प्रतिनिधी)