Dussehra 2023: दसऱ्याला घर खरेदीने केले सीमोल्लंघन, २२ दिवसांत सुमारे सव्वा लाख घर खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 11:10 AM2023-10-24T11:10:49+5:302023-10-24T11:11:20+5:30
का अर्थाने बांधकाम व्यवसायाला नवदुर्गेची कृपादृष्टी झाल्याचे बांधकाम व्यावसायिकांची भावना आहे....
पुणे : राज्य सरकारने रेडीरेकनर दरात वाढ न करता ई-रजिस्ट्रेशनसारखा पर्याय, नव्याने सुरू होणारे प्रकल्प यामुळे राज्यभरात घर खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पितृपक्षातही एरवी महिन्याला सरासरी १ लाख ३० हजार असलेली घर खरेदी ऑक्टोबरच्या २२ दिवसांत सुमारे सव्वा लाख इतकी झाली आहे, तर नवरात्रीमध्ये पुणे शहरात दिवसाकाठी सुमारे साडेतीनशेहून अधिक घरांची खरेदी झाली आहे. एका अर्थाने बांधकाम व्यवसायाला नवदुर्गेची कृपादृष्टी झाल्याचे बांधकाम व्यावसायिकांची भावना आहे.
कोरोनापूर्वीच्या दोन वर्षांमध्ये बांधकाम व्यवसाय आर्थिक संकटात सापडला होता. मात्र, त्यानंतर बांधकाम व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळाली. गेल्या वर्षी घरांच्या खरेदी विक्रीतून राज्य सरकारला सुमारे ४५ हजार कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. यंदाच्या वर्षासाठी रेडीरेकनर दरांमध्ये वाढ करू नये, अशी विनंती बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईने राज्य सरकारला केली होती. दरात वाढ केल्यास घर खरेदी विक्रीच्या वेगाला लगाम बसेल, अशी चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळेच ही वाढ करू नये, अशी विनंती करण्यात आली होती. रेडीरेकनर दरात वाढ न केल्यास महसुलात आणखी किमान १५ ते २० टक्के वाढ होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने रेडीरेकनर दरांत वाढ केली नाही.
महिन्याला सरासरी १ लाख ३० हजार घरांची खरेदी विक्री होत असते. मात्र, ऑक्टोबरच्या केवळ २२ दिवसांमध्येच पितृपक्ष असतानाही सुमारे सव्वा लाख घरांची खरेदी विक्री झाली आहे. त्यामुळे घर खरेदीमुळे ४५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळेल अशी अपेक्षा क्रेडाई पुण्याचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनी व्यक्त केली. पुण्याचा विचार करता नवरात्रीमध्ये दर दिवशी साडेतीनशेहून अधिक घरांची खरेदी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
साधारणपणे दिवाळी संपल्यानंतर काही प्रकल्पांचे दर वाढतात. नवीन लॉन्च होणाऱ्या प्रकल्पांमुळे ही वाढ दिसून येते. त्यामुळे दिवाळीपूर्वी घर खरेदी करण्याचे प्रमाण जास्त असते. याच काळात दर कमी असल्याचा फायदा ग्राहक घेतात. त्यामुळे ही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
- रणजित नाईकनवरे, अध्यक्ष, क्रेडाई, पुणे